दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) ३१ जुलै - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामच्या नियोजनात भाविकांची सुरक्षितता, गर्दी व्यवस्थापन, वाहतूक, जलनिस्सारण, आपत्कालीन सेवा आणि अखाड्यांच्या गरजांचा सर्वंकष विचार केला जावा. साधुग्राममधील प्रत्येक सुविधा ही भाविकांच्या सुरक्षिततेला पूरक ठरेल अशाच पद्धतीने अंतिम आराखडा तयार करावा, असे स्पष्ट निर्देश कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील 'साधुग्राम नियोजन' संदर्भात आयोजित विशेष आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक संजय ऐनपुरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आढावा बैठकीतील मुख्य निर्णय व नियोजन:
सर्वसामान्य भाविकांसाठी घाटांची लांबी उपलब्ध राहणार:
घाटांची जास्तीत जास्त लांबी ही सर्वसामान्य भाविकांच्या स्नानासाठी मोकळी ठेवली जाईल. गर्दीची घनता कमी करण्यासाठी रस्ते, घाट, पार्किंग आणि पादचारी मार्गांचे वैज्ञानिक (Scientific) पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अखाड्यांच्या पारंपरिक स्थानांचा सन्मान:
साधुग्राममधील भूखंडांचे वाटप करताना अखाड्यांच्या पारंपरिक स्थानांचा आणि परंपरांचा पूर्ण सन्मान राखूनच नियोजन केले जाईल. यासोबतच टेंट सिटी, व्हीआयपी क्षेत्र आणि सांस्कृतिक सुविधांचे टप्पे निश्चित केले जातील.
उच्चदाब वीजवाहिन्यांचे पुनर्संरेखन:
साधुग्राम क्षेत्रातील महावितरणच्या उच्चदाब वीजवाहिन्यांमुळे बाधित होणाऱ्या भूखंडांचा आढावा घेण्यात आला. कायमस्वरूपी रस्त्यांच्या रेषेनुसार (Alignment) या वीजवाहिन्या हलवण्याबाबत चर्चा झाली, ज्यामुळे साधुग्रामासाठी अधिक सुरक्षित व उपयुक्त जागा उपलब्ध होईल.
पर्यावरण अन् नैसर्गिक जलप्रवाहांचे संरक्षण:
नदी संवर्धन आणि नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह अबाधित ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. साधुग्रामसाठी स्वतंत्र ड्रेनेज (जलनिस्सारण) आराखडा तयार करण्यात येणार असून नदी संरक्षित पट्टा (River Protection Zone) पाळला जाईल.
वैज्ञानिक अभ्यास आणि सादरीकरण:
बैठकीच्या सुरुवातीला कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील प्रस्तावित साधुग्रामच्या आराखड्याचे सविस्तर सादरीकरण केले. मागील सिंहस्थातील अनुभव, अखाड्यांच्या सूचना, प्रत्यक्ष स्थळ पाहणी आणि भविष्यातील भाविकांची संभाव्य संख्या लक्षात घेऊन हा डिजिटल व पायाभूत आराखडा तयार करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.