मनोहर शिंदे, (नाशिक) ३० जुलै - जिल्ह्यातील दिंडोरी आणि सुरगाणा तालुका परिसरात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने (NCS) दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, २५ जुलै २०२६ पासून या भागात भूकंपाच्या हालचालींची नोंद झाली आहे. २९ जुलै सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ९ सौम्य धक्के बसले असून, नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
'भूकंप समूह' म्हणजे काय?
शास्त्राच्या भाषेत या घटनेला “भूकंप समूह” (Earthquake Swarm) म्हटले जाते. यामध्ये कोणताही एक मोठा आणि मुख्य धक्का न येता, कमी कालावधीत अनेक लहान-लहान सौम्य धक्के बसतात. या धक्क्यांची खोली उथळ (साधारण १० किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी) असल्याने जमिनीखालून गडगडाटासारखा मोठा आवाज येतो. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते, परंतु हा या प्रक्रियेचाच एक भाग आहे.
भूकंपाची मुख्य आकडेवारी आणि निरीक्षणे:
एकूण धक्के: २५ ते २९ जुलैदरम्यान एकूण ९ धक्के नोंदवले गेले.
तीव्रता: हे धक्के M २.८ ते M ३.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे होते. यातील ७ धक्के M ३.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचे होते.
सर्वाधिक तीव्र धक्का: २८ जुलै रोजी दुपारी ३.२७ वाजता सर्वाधिक M ३.९ तीव्रतेचा धक्का नोंदवला गेला.
नाशिक जिल्हा 'झोन-३' मध्ये; ऐतिहासिक पार्श्वभूमी:
भारतीय मानक ब्युरोच्या (BIS) नकाशांनुसार नाशिक जिल्हा हा 'भूकंप क्षेत्र-३' (Seismic Zone III) मध्ये येतो. ऐतिहासिक नोंदींनुसार, या भागात सन १९०० ते २०२६ या कालावधीत M ५.० पेक्षा जास्त तीव्रतेचा मोठा भूकंप झालेला नाही. या भागातील आजवरचा सर्वात मोठा भूकंप २६ फेब्रुवारी १९८६ रोजी झाला होता, ज्याची तीव्रता M ४.३ नोंदवली गेली होती.
अचूक अंदाज अशक्य; वेधशाळांचे २४/७ लक्ष!
सद्यस्थितीत जगात कोठेही भूकंपाची अचूक वेळ, ठिकाण आणि तीव्रतेचा आधीच अंदाज वर्तवण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध नाही. मात्र, NCS ची नाशिक वेधशाळा आणि महाराष्ट्रातील सर्व संबंधित वेधशाळा या हालचालींवर २४ तास (२४x७) बारीक लक्ष ठेवून आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिक व बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या इमारती आणि घरे BIS च्या भूकंपरोधक निकषांनुसार बांधलेली असणे आवश्यक आहे, असा सल्लाही देण्यात आला आहे.