एस.के. खेडकर, (नाशिक) ३० जुलै - शासनाच्या 'आपले सरकार' पोर्टलवरून लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत सेवा पुरवण्यात नाशिक जिल्हा प्रशासनाने राज्यात कौतुकास्पद कामगिरी केली आहे. राज्यस्तरीय मूल्यांकनात नाशिक जिल्ह्याने ८.७६ गुणांसह संपूर्ण राज्यात ७ वा क्रमांक पटकावला आहे. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक अर्जांचा प्रचंड आवाका सांभाळूनही प्राप्त अर्जांपैकी ९३ टक्के अर्ज निर्धारित वेळेत निकाली काढण्याची धडक कामगिरी नाशिकने केली आहे.
हिंगोलीपेक्षा ५ पट अधिक अर्ज, तरीही दमदार कामगिरी
शासनाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जून २०२६ मध्ये नाशिक जिल्ह्यात तब्बल १ लाख ५४ हजार ९८४ नवीन अर्ज प्राप्त झाले होते.
कामाचा प्रचंड ताण: प्रथम क्रमांकावर असलेल्या हिंगोली जिल्ह्याच्या (३२,४९८ अर्ज) तुलनेत नाशिकमध्ये जवळपास ५ पट अधिक अर्ज आले होते. तर दुसऱ्या क्रमांकावरील अहिल्यानगरपेक्षा १८ टक्के अधिक अर्ज नाशिकमध्ये आले होते.
यशस्वी निपटारा: या सर्व अर्जांपैकी जिल्हा प्रशासनाने १ लाख ४८ हजार २३४ अर्जांचा यशस्वी निपटारा केला असून, ९३ टक्के अर्ज लोकसेवा हक्क कायद्याच्या चौकटीत वेळेत पूर्ण केले.
अर्ज फेटाळण्याचे प्रमाण अत्यल्प (केवळ ०.४ टक्के)
नागरिकांना सेवा देताना अर्ज विनाकारण फेटाळण्यावर प्रशासनाने चाप लावला आहे. नाशिकमध्ये अर्ज फेटाळण्याचे प्रमाण अवघे ०.४ टक्के इतके कमी आहे, जे प्रथम क्रमांकावरील हिंगोलीच्या (०.८ टक्के) तुलनेतही चांगले आहे. यावरून अर्जांची अचूक छाननी व पारदर्शकता स्पष्ट होते. नागरिकांच्या प्रतिसादाच्या (Citizen Score) निकषावर नाशिकला ५ पैकी ४.६ गुण मिळाले आहेत.
"नाशिक हा मोठा आणि जास्त लोकसंख्येचा जिल्हा आहे. इथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक अर्ज येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणातील अर्जांचे यशस्वी व्यवस्थापन ही जिल्हा प्रशासनाच्या कार्यक्षमतेची पावती आहे. येत्या काळात वेळेत निपटारा करण्याचे प्रमाण आणखी वाढवून नाशिकला अव्वल ३ जिल्ह्यांमध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न राहील."
— आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक