नाशिक, (प्रतिनिधी) २९ जुलै - शहर आणि परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून मंगळवारी (२८ जुलै) वेगवेगळ्या तीन भागांत राहणाऱ्या तिघांनी राहत्या घरी गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली. मृतांमध्ये एका विवाहीत महिलेसह दोघा पुरुषांचा समावेश आहे. तिघांच्याही आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी आडगाव, उपनगर आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना: कोणार्क नगर भागात २४ वर्षीय युवकाची आत्महत्या
कोणार्क नगर परिसरातील शिवालीक कायरा, सयाजी पॅलेसजवळ राहणारा अखिलेश विश्वनाथ यादव (वय २४) या युवकाने मंगळवारी रात्री अज्ञात कारणातून राहत्या घरातील स्वयंपाकघरात पंख्याला चादरीचा काट बांधून गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच त्याचा मित्र परमहंस कुमार राय याने त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मात्र डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार पाटील पुढील तपास करत आहेत.
दुसरी घटना: देवळाली गावात २३ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
देवळाली गावातील वडारवाडी परिसरात राहणाऱ्या निशा राजू पवार-शिंदे (वय २३) या विवाहितेने मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून राहत्या घरातील बेडरूममध्ये लोखंडी अँगलला ओढणी बांधून गळफास घेतला.
पती राजू पवार यांनी त्यांना तात्काळ बिटको रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार गोसावी तपास करत आहेत.
तिसरी घटना: गंजमाळ येथे ४४ वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
गंजमाळ परिसरातील हेरीटेज हॉटेलमागे, पंचशील नगर येथे राहणारे गणेश चिंतामण दळवी (वय ४४) यांनी मंगळवारी अज्ञात कारणातून राहत्या घरातील किचनमध्ये लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला.
त्यांना बेशुद्ध अवस्थेत मंगेश मेदकर यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार निंबाळकर पुढील तपास करत आहेत.