नाशिकला या दिवशी मुसळधार पावसाचा अलर्ट... जिल्हाधिकाऱ्यांनी दिले हे आदेश...

Share:
Main Image
Last updated: 29-Jul-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) २९ जुलै - भारतीय हवामान विभागाने (IMD) शुक्रवारी, ३१ जुलै रोजी नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी २४ तास सतर्क राहून आपत्कालीन नियोजन पूर्ण ठेवावे, असे कडक निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने आणि कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्या उपस्थितीत आपत्कालीन पूर्वतयारीची आढावा बैठक पार पडली.

गर्भवतींचे आधीच स्थलांतर करा; आरोग्य यंत्रणेला आदेश

आपत्कालीन परिस्थितीत संभाव्य अडचण टाळण्यासाठी आरोग्य विभागाने ४ ऑगस्टपूर्वी प्रसूती अपेक्षित असलेल्या सर्व गरोदर महिलांची यादी तातडीने तयार करावी. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आधीच जवळच्या शासकीय अथवा मान्यताप्राप्त रुग्णालयात दाखल करण्याची कार्यवाही करावी, असे विशेष आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

धरणात 'बफर स्टॉक' अन् धोकादायक पुलांवर नजर

Advertisement

धरणांचे नियोजन: धरणांच्या मोकळ्या पाणलोट क्षेत्रातून (Free Catchment) अचानक येणारा पाऊस सामावून घेता यावा, यासाठी धरणांमध्ये आवश्यक 'बफर साठा' ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वाहतूक नियंत्रण: नदी-नाल्यांवरील सखल व कमी उंचीच्या पुलांवर पाणी वाढल्यास तातडीने वाहतूक बंद करण्यासाठी चोवीस तास बंदोबस्त ठेवला जाईल.

नालेसफाई व यंत्रणा सज्ज: शहरे आणि गावांमध्ये 'फ्लॅश फ्लड' (अचानक पूर) टाळण्यासाठी नाले तातडीने साफ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जेसीबी, सक्शन पंप, पोकलेन, महावितरणची ब्रेकडाउन वाहने आणि बचाव पथके २४ तास सज्ज ठेवण्यात आली आहेत.

धोकादायक इमारती व दरडग्रस्त भाग: मोडकळीस आलेल्या इमारतींमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे तसेच दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागात सतत पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

"सध्या घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. मात्र अलीकडील भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने सतर्क राहावे. जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे."

— आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक

Advertisement

Comments

No comments yet.