नाशिक-पुणे हायवेबाबत केंद्र सरकारची मोठी घोषणा... खासदार वाजेंच्या पाठपुराव्याला यश...

Share:
Main Image
Last updated: 29-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) २९ जुलै - नाशिकच्या औद्योगिक, कृषी आणि सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला नाशिक-पुणे महामार्ग (NH-60) सध्या वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांमुळे अत्यंत जीवघेणा ठरत आहे. या गंभीर प्रश्नाकडे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत केंद्र सरकारचे लक्ष वेधत आक्रमक पाठपुरावा केला. खासदार वाजे यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या महामार्गावरील कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून ₹७,८०१ कोटींच्या आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आल्याची माहिती संसदेत दिली.

चाकण आणि खेड परिसरातील कोंडीवर तातडीने उपाययोजना

खासदार वाजे यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नात नाशिक-पुणे महामार्गावरील खराब रस्ते, वाढते अपघात, प्रस्तावित बायपास, उड्डाणपूल, एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि नाशिकच्या औद्योगिक पायाभूत सुविधांबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती.

यावर उत्तर देताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, "राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा (NHAI) मार्फत जंक्शन सुधारणा आणि वाहतूक व्यवस्थापनाची कामे सुरू आहेत. विशेषतः चाकण आणि खेड परिसरातील भीषण वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तातडीची पावले उचलली जात आहेत." तसेच ₹७,८०१ कोटींचा हा महत्त्वाकांक्षी एलिव्हेटेड कॉरिडॉर टप्प्याटप्प्याने पूर्ण करून २०३०-३१ पर्यंत वाहतुकीसाठी सज्ज करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

Advertisement

महामार्ग म्हणजे नाशिकच्या अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी

खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत नमूद केले की, "हा महामार्ग केवळ रस्ता नसून नाशिकच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतमालाची वाहतूक, औद्योगिक मालाची ने-आण, विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत येथील दुरवस्थेमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे."

"पुणे–नाशिक महामार्ग हा नाशिकच्या विकासाचा कणा आहे. या मार्गावरील अपघातांमुळे व कोंडीमुळे शेतकरी, व्यापारी आणि नागरिक त्रस्त आहेत. हा प्रश्न मी संसदेत ठामपणे मांडला असून नाशिकच्या प्रत्येक प्रकल्पासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी माझा पाठपुरावा असाच सुरू राहील."

— राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक

Advertisement

Comments

No comments yet.