नाशकात येथे होणार म्हाडाचा गृहप्रकल्प... २,५५३ चौरस मीटर जमीन मंजूर...

Share:
Main Image
Last updated: 29-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) २९ जुलै - नाशिक शहरातील मखमलाबाद येथील एकूण २,५५३ चौरस मीटर जमिनीचे क्षेत्र नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाला (म्हाडा) १ रुपया प्रति चौरस मीटर या नाममात्र दराने वितरित करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले असून, यामुळे म्हाडाच्या विविध गृहनिर्माण व विकास प्रकल्पांना गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  

नागरी जमीन कमाल धारणा (यूएलसी) कायद्यांतर्गत अतिरिक्त घोषित होऊन महाराष्ट्र शासनाच्या नावे दाखल झालेल्या जमिनींपैकी मखमलाबाद येथील तीन वेगवेगळ्या सर्वे नंबरमधील जागा म्हाडाला वर्ग करण्यात आल्या आहेत.  

मंजूर जमिनीचा तपशील

जिल्हा तांत्रिक समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार व भूमी अभिलेख कार्यालयाच्या मोजणी नकाशांनुसार खालील मिळकती म्हाडाला हस्तांतरित करण्यात येत आहेत: 

अ.क्र.गावाचे नावसर्व्हे / गट नंबरक्षेत्र (चौरस मीटर)जागेची नाममात्र किंमत

१ मखमलाबाद ४९/४/२७ ६५.००₹ ७६५/-

२ मखमलाबाद २४/१/ब/२/२८ २८.००₹ ८२८/-

३ मखमलाबाद ५३/९/६३ ९६०.००₹ ९६०/-

एकूण——२,५५३.०० ₹ २,५५३/-

Advertisement

शासकीय नियम व शुल्क भरणा पूर्ण

सदर जमिनीचे नाममात्र मूल्य एकूण ₹ २,५५३/- इतके होत असून, म्हाडाने ही रक्कम '००२९' या शासकीय लेखाशीर्षाखाली शासकीय कोषागारात जमा केली आहे. अपर तहसीलदार नाशिक यांच्यामार्फत या चलनाची प्रत प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ आणि नगर विकास विभागाच्या शासन निर्णयातील अधिकारान्वये ही जागा म्हाडाकडे वर्ग करण्याचे अंतिम आदेश दिले.  

महत्त्वाच्या अटी व शर्ती

जिल्हा प्रशासनाने ही जमीन हस्तांतरित करताना काही प्रमुख अटी घातल्या आहेत:  

तीन वर्षांची मुदत: ताबा मिळाल्यापासून तीन वर्षांच्या आत दिलेल्या प्रयोजनासाठी जमिनीचा वापर सुरू करणे बंधनकारक राहील.  

भोगवटादार वर्ग-२: सदर जमीन भोगवटादार वर्ग-२ म्हणून राहील. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय ही जागा हस्तांतरित, विक्री, गहाण किंवा पोट-विभाजित करता येणार नाही.  

वाणिज्यिक वापरास बंदी: या जमिनीचा वापर केवळ मंजूर प्रयोजनासाठीच करावा लागेल; कोणत्याही परिस्थितीत व्यावसायिक (वाणिज्यिक) वापर करता येणार नाही.  

रस्ता व पर्यावरण: जागेसाठी किमान १२ मीटर रुंदीचा पोहोच रस्ता असणे आवश्यक आहे. तसेच दर १०० चौरस मीटर जागेत एक याप्रमाणे वृक्षारोपण करून त्याची जोपासना करावी लागेल.  

अपर तहसीलदार नाशिक यांनी जमिनीचा प्रत्यक्ष ताबा देण्यापूर्वी न्यायालयात कोणताही वाद नसल्याची खातरजमा करावी, तसेच म्हाडाकडून आवश्यक करारनामा नोंदवून घेतल्यानंतरच ताबा द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.