मानधन घेऊनही कार्यक्रम सोडला... भास्कर पेरे पाटील यांचा कळवण दौरा वादात...

Share:
Main Image
Last updated: 28-Jul-2026

कळवण, (प्रतिनिधी) २८ जुलै - रोटरी क्लब ऑफ कळवणच्या रौप्य महोत्सवी सोहळा आणि पदग्रहण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रसिद्ध वक्ते भास्कर पेरे पाटील कार्यक्रमाच्या ऐन मध्यातून मानधन घेऊन निघून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे आयोजकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात असून, मानधन व झालेला खर्च परत न केल्यास महाराष्ट्रभर बदनामी करण्याचा इशारा रोटरी क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

ऐन मध्यातून प्रस्थान केल्याने संताप

रोटरी क्लब ऑफ कळवणचा रौप्य महोत्सव आणि पदग्रहण सोहळा अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम रात्री ९ वाजेपर्यंत नियोजित होता आणि त्यानंतर स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, प्रमुख पाहुणे भास्कर पेरे पाटील यांनी सायंकाळी साडेसहा वाजताच मानधन घेऊन कार्यक्रमातून काढता पाय घेतला. प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती ही केवळ औपचारिकता नसून कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचा सन्मान असतो, परंतु त्यांच्या अशा अचानक जाण्याने उपस्थितांमध्ये मोठी खंत आणि रोष निर्माण झाला आहे.

ग्रामीण भागातील ऐतिहासिक कामगिरीचा अपमान?

Advertisement

रोटरी ही राजकीय किंवा व्यावसायिक नसून जागतिक सामाजिक संस्था आहे. रोटरीच्या भारतातील इतिहासात अवघ्या २५ वर्षांच्या कार्यकाळात तब्बल तीन ग्लोबल ग्रँट प्रकल्प यशस्वीपणे राबविणारा कळवण रोटरी क्लब हा देशातील एकमेव ग्रामीण क्लब आहे. स्वतःचा वेळ, पैसा आणि श्रम खर्च करून समाजहित जपणाऱ्या कार्यकर्त्यांना मान्यवरांकडून प्रोत्साहनाची अपेक्षा असते; मात्र पेरे पाटलांच्या या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

‘...तर महाराष्ट्रभर बदनामी करू!’

या घटनेनंतर रोटरी क्लब ऑफ कळवणचे पदाधिकारी अत्यंत आक्रमक झाले असून, भास्कर पेरे पाटील यांनी घेतलेले मानधन आणि कार्यक्रमाचा झालेला खर्च तत्काळ परत करावा, अन्यथा राज्यभरात त्यांची बदनामी केली जाईल, असा सडेतोड इशारा आयोजकांनी दिला आहे.

समाजसेवेचा प्रवास थांबणार नाही

एखाद्या व्यक्तीच्या अशा वागण्याने निराशा झाली असली, तरी रोटरीच्या सेवाभावी वाटचालीत कोणताही अडथळा येणार नाही. व्यक्ती येतात आणि जातात, पण समाजसेवेची परंपरा कायम राहते. यापुढेही अधिक जोमाने आणि समर्पणाने सामाजिक उपक्रम राबवत राहू, असा दृढ विश्वास क्लबच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे

Advertisement

Comments

No comments yet.