इगतपुरी, (प्रतिनिधी) २८ जुलै - तालुक्यातील मौजे आंबेवाडी येथे सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या मध्यभागातील डोंगराचा मोठा भाग खचल्याची गंभीर घटना घडली आहे. डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे मोठे दगड-गोटे, मुरूम आणि माती वेगाने खाली येऊन वनपट्टेधारक व खाजगी जमीनधारक आदिवासी बांधवांच्या शेतात पसरली आहे. यामुळे संपूर्ण शेती खरडून व वाहून गेली असून परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन इगतपुरीचे तहसीलदार अभिजीत बारवकर यांनी आपत्तीग्रस्त आंबेवाडी परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.
४ विभागांमार्फत संयुक्त पंचनाम्यांना सुरुवात
शासन निर्णय (GR) २७ मार्च २०२३ मधील निर्देशांनुसार, प्रशासनाकडून तात्काळ मदतकार्याला गती देण्यात आली आहे. कृषी विभाग, वन विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकास विभाग या चारही विभागांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करण्याचे काम तातडीने सुरू केले आहे.
पुनर्वसन आणि उपाययोजनांसाठी अंदाजपत्रक
बाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि जमीन पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाने खालील महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत:
१. ड्रोनद्वारे सर्वेक्षण: आदिवासी बांधवांची खरडलेली शेती पूर्ववत करण्यासाठी आणि प्रत्यक्ष नुकसानीचा अचूक अंदाज घेण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण (Drone Survey) करून विशेष अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
२. 'कट वेअर' (Cut Weir) बंधारा: डोंगरावरून येणाऱ्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाचे नियंत्रण करण्यासाठी आणि त्याचा भविष्यात सदुपयोग व्हावा यासाठी 'कट वेअर' बंधारा बांधण्याचा प्रस्ताव व अंदाजपत्रक तयार केले जात आहे.
प्रशासनाकडून सर्व संबंधित विभागांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, बाधित आदिवासी शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे तहसीलदार अभिजीत बारवकर यांनी स्पष्ट केले.