गोविंद नगरमध्ये विकास की विनाश? पाईपलाईनच्या कामामुळे २०० झाडांवर कुऱ्हाड...

Share:
Main Image
Last updated: 27-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २७ जुलै - गोविंद नगर परिसरातील जॉगिंग ट्रॅक भागात सुरू असलेल्या वॉटर पाईपलाईनच्या कामादरम्यान बेसुमार अन् बेजबाबदारपणे खोदकाम करण्यात आल्याने अनेक झाडे उन्मळून पडली आहेत, तर जवळपास २०० हून अधिक झाडे अत्यंत धोकादायक स्थितीत सापडली आहेत. या प्रकारामुळे पर्यावरणाचा गंभीर ऱ्हास होत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. याप्रकरणी महानगरपालिकेने तातडीने संयुक्त पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी 'निसर्गसेवक युवा मंचा'ने केली आहे.

निसर्गसेवक युवा मंचाचे महापालिका प्रशासनाला निवेदन

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन निसर्गसेवक युवा मंचाचे अध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान अधीक्षक, जलपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, सिडको विभागीय अधिकारी आणि उद्यान निरीक्षक यांना निवेदन दिले आहे. तसेच या निवेदनाच्या प्रती मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त (शहर), शहर अभियंता आणि वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

पाईपलाईन टाकताना वृक्षांच्या मुळांलगतच मोठे खड्डे खोदल्यामुळे झाडांना असणारा मातीचा मुख्य आधार नष्ट झाला आहे. परिणामी काही झाडे कोसळली असून उर्वरित झाडेही उन्मळून पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

निसर्गसेवक युवा मंचाच्या प्रमुख मागण्या:

Advertisement

संयुक्त पाहणी व पंचनामा: उद्यान विभाग, वृक्ष प्राधिकरण आणि अभियांत्रिकी विभागाने तात्काळ घटनास्थळाची संयुक्त पाहणी करून अधिकृत पंचनामा करावा.

कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई: या नुकसानास जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर तसेच निष्काळजी अधिकाऱ्यांवर 'महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५' अन्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

झाडांवर उपचार व सुरक्षा: नुकसान झालेल्या वृक्षांवर तातडीने वनस्पती तज्ज्ञांमार्फत उपचार करून उर्वरित झाडे वाचवण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

पारदर्शक माहिती: या कामासाठी दिलेल्या परवानग्या, झालेली पाहणी आणि करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल प्रशासनाने लेखी स्वरूपात प्रसिद्ध करावा.

७ दिवसांत कारवाई करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा!

प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन येत्या सात दिवसांच्या आत दोषींवर कारवाई करावी, अशी मुदत मंचाने दिली आहे. अन्यथा उपलब्ध कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्यासोबतच पर्यावरणप्रेमी नागरिक आणि स्थानिक रहिवाशांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा अमित कुलकर्णी यांनी दिला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.