गोदावरीला पुन्हा महापूर... निफाडमध्ये ४२९ जणांचे स्थलांतर... कुठे वाहतूक कोंडी? कोणते रस्ते बंद?

Share:
Main Image
Last updated: 26-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) २६ जुलै - नाशिक शहर आणि जिल्ह्याला गेल्या २४ तासांपासून मुसळधार ते अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. दारणा, गंगापूर आणि चणकापूरसह प्रमुख धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीसह जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ३२ घरांची पडझड, शेतीचे नुकसान आणि वाहतुकीची कोंडी झाली आहे. “जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात असून संपूर्ण प्रशासन युद्धपातळीवर सतर्क आणि कार्यरत आहे,” अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

बाणगंगा नदीला पूर; नाशिक शहरात कुंभमेळ्याच्या कामांमुळे वाहतूक कोंडी

बाणगंगा नदीची पातळी वाढली: ओझर परिसरात दिवसभर सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे तेथील बाणगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, आवश्यकता भासल्यास नागरिकांचे तातडीने स्थलांतर केले जाणार आहे.

नाशिक शहरात पाणीच पाणी: नाशिक शहरात दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने ठिकठिकाणी पाणी साचले. त्यातच आगामी कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यासह शहरातील प्रमुख मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली.

महापालिका यंत्रणा सज्ज: सायंकाळी ६ वाजेपर्यंत गंगापूर धरण परिसरात ६२ मिमी, त्र्यंबकेश्वर येथे ३० मिमी आणि आंबोली परिसरात ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे. नदीपात्रातील पाणी वाढल्याने महापालिकेने गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पूर आणि नुकसानीचा सविस्तर आढावा:

१. जीवित व मालमत्तेची हानी:

दुर्दैवी दुर्घटना: बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथे शेती पंप सुरू करताना विजेचा तीव्र धक्का लागून शेतकरी समाधान सहादू पगार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

जखमी व पडझड: इगतपुरी व सिन्नर तालुक्यात प्रत्येकी १ व्यक्ती जखमी झाली आहे. जिल्ह्यात एकूण ३२ घरांची पडझड झाली असून इगतपुरी (९), निफाड (६), सुरगाणा (५) आणि कळवण (४) तालुक्यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. सुरगाण्यात २ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.

आंबेवाडीत भूस्खलन: इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथे मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन वनपट्ट्यातील १५ हेक्टर (८ शेतकरी) व खाजगी क्षेत्रातील ६५ हेक्टर (४० शेतकरी) अशी एकूण ८० हेक्टर शेती बाधित झाली आहे.

२. ४२९ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर:

निफाड तालुक्यातील गोदावरीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने प्रशासनाने तातडीने ४२९ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.

सायखेडा: १७० व्यक्ती (जनता इंग्लिश स्कूल)

चांदोरी: १३४ व्यक्ती (गोदावरी सेवा सहकारी संस्था हॉल)

Advertisement

चाटोरी: १२५ व्यक्ती (जि.प. शाळा व मारुती मंदिर)

३. रस्ते व वाहतूक स्थिती:

इगतपुरीतील काळूस्ते-फोडसेवाडी रस्ता आणि सुरगाणातील गहाले-चिंचदा पूल सुरक्षेचा उपाय म्हणून बंद करण्यात आला आहे. तर सापुतारा-वणी मार्गावरील घागबारी येथे अडकलेले अवजड वाहन हटवून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पेठ, कळवण, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, मालेगाव आणि चांदवडमधील रस्ते पाणी ओसरल्यानंतर पूर्ववत सुरू करण्यात आले आहेत.

४. दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील बानगंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे नाशिक एअरपोर्ट रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.

प्रमुख धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग (क्युसेक्समध्ये):

धरण / प्रकल्पविसर्ग (क्युसेक्स)

नांदूर मध्यमेश्वर ४९,०६६

दारणा धरण ८,८५८

होळकर पूल ८,८०१

चणकापूर धरण ७,५९१

गंगापूर धरण ४,४१०

पालखेड / हरणबारी २,७३६ / २,५८८

"जिल्ह्यातील सर्व यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास सतर्क आहेत. बाधित क्षेत्रांत नुकसानीचे प्रत्यक्ष पंचनामे सुरू आहेत. नागरिकांनी नदी, नाले आणि पूरग्रस्त भागांमध्ये जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे."

— आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, नाशिक)

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.