नाशिकच्या या मोहिमेचा डंका... थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक...

Share:
Main Image
Last updated: 26-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) २६ जुलै - जलसंवर्धनासाठी नाशिक जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे फलित थेट राष्ट्रीय स्तरावर दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या लोकप्रिय 'मन की बात' कार्यक्रमात नाशिकच्या जलसंवर्धन पॅटर्नची विशेष दखल घेत कौतुक केले आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आली असून, जलसंधारणाला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

कसे घडले हे परिवर्तन?

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्ह्यात 'कॅच द रेन' (Catch the Rain) अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवले जात आहे. या मोहिमेत:

विविध योजनांचा मेळ: जलयुक्त शिवार २.०, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार, नाला खोलीकरण व रुंदीकरण, आणि कृत्रिम भूजल पुनर्भरण विहिरी (रिचार्ज शाफ्ट).

शाश्वत शेती व जलअर्थसंकल्प: सूक्ष्म सिंचन, जलअर्थसंकल्प (वॉटर बजेटिंग), जलकार्यक्षम शेती आणि 'जलतारा' यांसारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमांना गती देण्यात आली.

वनहक्क लाभार्थ्यांचा कायापालट: वनहक्क कायद्यांतर्गत (FRA) जमिनी मिळालेल्या लाभार्थ्यांच्या शेतात मृद व जलसंधारणाची कामे करून त्या जमिनी उत्पादक आणि शाश्वत करण्यात आल्या.

Advertisement

राष्ट्रीय वेबिनारमध्ये नाशिकचे सादरीकरण!

या प्रभावी कामगिरीमुळे भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या 'National Water Mission' अंतर्गत आयोजित ५५ व्या राष्ट्रीय वेबिनारमध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना 'Best Practices of Water Management' या विषयावर सादरीकरणासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते.

'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

"पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याच्या 'कॅच द रेन' मोहिमेला लोकचळवळ बनवण्याचे आवाहन मी केले होते. 'जिथे पाऊस पडेल, जेव्हा पाऊस पडेल, पाणी तिथेच साठवा' हा संदेश गावे आणि शहरांनी आत्मसात केला आहे. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवण्याची क्षमता निर्माण झाली आहे. बंद पडलेले बोअरवेल आता भूजल पुनर्भरणाचे माध्यम बनले आहेत. आज वाचवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब हा येणाऱ्या पिढ्यांच्या सुरक्षित भविष्याची सर्वात मोठी पुंजी ठरेल," अशा शब्दांत पंतप्रधानांनी नाशिकच्या कामाची प्रशंसा केली.

लोकसहभागातून जलसुरक्षा मजबूत

शाकीय विभाग, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जिल्ह्यात जलसंधारण ही केवळ एक सरकारी योजना न राहता 'लोकचळवळ' बनली आहे. जुन्या जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, वृक्षारोपण आणि पावसाचे पाणी जतन करण्याच्या या प्रयत्नांमुळे जिल्ह्याची जलसुरक्षा अधिक बळकट झाली आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.