नाशिक आणि मालेगावमध्ये FDA ची जोरदार कारवाई... बघा, कुठे काय झाले जप्त?

Share:
Main Image
Last updated: 25-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २५ जुलै - नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) नाशिक विभागात धडक विशेष तपासणी मोहीम राबवली. राज्याचे एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत लाखो रुपयांचा संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला असून, विनापरवाना चालणाऱ्या व्यवसायांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

नाशिक विभागाचे सह आयुक्त (अन्न) मंगेश माने यांच्या नेतृत्वाखाली २२ जुलै रोजी विभागातील विविध अन्न आस्थापनांची अचानक तपासणी करण्यात आली. यात अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

कुठे काय कारवाई झाली?

मालेगाव (सोयाबीन तेल जप्त):

मालेगाव येथील चंदनपुरी शिवारातील मेसर्स श्रीराम एंटरप्रायझेस येथून १७ लाख २७ हजार रुपयांचे सैल स्वरूपातील रिफाइंड सोयाबीन तेल जप्त करण्यात आले. रिपॅकर किंवा उत्पादन परवाना नसणे, विक्री बिल न मिळणे आणि भेसळीचा संशय असल्याने ही कारवाई एफडीओ प्रतिक भड व चेतन परदेशी यांनी केली.

मालेगाव (बेकरीला नोटीस):

कल्ली कुट्टी परिसरातील मेसर्स ए-वन ताज बेकरी येथे अतिशय अस्वच्छ वातावरणात आणि विनापरवाना टोस्ट बनवले जात असल्याचे आढळले. एफडीएने तेथील १ लाख ६० हजार रुपयांचा (४०० किलो) टोस्टचा साठा जप्त करत आस्थापनाला तातडीने 'स्टॉप बिझनेस' (काम बंद) नोटीस बजावली.

आडगाव, नाशिक (बनावट तूप जप्त):

Advertisement

जत्रा हॉटेल परिसरातील मेसर्स स्वागतम स्वीट्स येथून ९ किलो संशयित व निकृष्ट दर्जाचे गाईचे तूप (किंमत ₹५,७६०) जप्त करण्यात आले. ही कारवाई अधिकारी संकेत येलमामे व वैभव गर्दे यांनी केली.

जुने नाशिक (गुन्हा दाखल व दुकान सील):

चौक मंडईतील मेसर्स भारत जनरल स्टोअर येथून १ लाख १ हजार ७२६ रुपयांचे प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात बीएनएस (BNS) आणि अन्न सुरक्षा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित दुकान सील करण्यात आले आहे.

उपनगर, नाशिक (परवाना निलंबित):

अन्न सुरक्षा कायद्यातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी उपनगर येथील 'सँडी बेकर्स' या दुकानाचा अन्न व्यवसाय परवाना सहाय्यक आयुक्त व्ही. पी. धवड यांनी निलंबित केला आहे.

तक्रार करण्याचे एफडीएचे आवाहन

"नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरुद्ध ही विशेष तपासणी मोहीम आगामी काळात अधिक तीव्र केली जाईल. सर्व अन्न व्यावसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. ग्राहकांना अन्नाच्या दर्जाबाबत किंवा स्वच्छतेबाबत शंका असल्यास त्यांनी तात्काळ अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी."

— मंगेश माने (सह आयुक्त, एफडीए नाशिक)

Advertisement

Comments

No comments yet.