नाशिक पोलिसांची जबरदस्त कामगिरी... १.३३ कोटींचे ८४८ मोबाईल शोधले... मूळ मालकांच्या स्वाधीनही केले...

Share:
Main Image
Last updated: 25-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) २५ जुलै - नाशिक शहर पोलिसांच्या ‘मोबाईल शोध विशेष पथकाने’ पुन्हा एकदा अत्यंत सराहनीय कामगिरी केली आहे. नागरिकांचे गहाळ किंवा हरवलेले मोबाईल शोधून काढत, आज दिनांक २४ जुलै २०२६ रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात तब्बल १ कोटी ३३ लाख ८९ हजार ७२२ रुपये किमतीचे ८४८ मोबाईल हँडसेट त्यांच्या मूळ मालकांना पोलीस आयुक्त कार्यालयात सस्नेह सुपूर्द करण्यात आले.

‘मोबाईल शोध विशेष पथक’ ठरतेय प्रभावी

नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोधून त्यांना परत मिळवून देण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जुलै २०२५ मध्ये ‘मोबाईल शोध विशेष पथक’ स्थापन केले होते. या पथकातील अधिकारी व अंमलदारांना सतत मार्गदर्शन करून गहाळ मोबाईल शोधण्याबाबतचा नियमित आढावा घेतला जातो.

या विशेष पथकाने पोलीस ठाण्याकडील गहाळ मोबाईलची माहिती गोळा करून तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने तांत्रिक व मानवी कौशल्याचा योग्य वापर केला. याच उत्कृष्ट समन्वयामुळे दि. ०१/०१/२०२६ ते दि. २३/०७/२०२६ या कालावधीत मिळून आलेले एकूण ८४८ मोबाईल आज पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते नागरिकांना परत देण्यात आले.

आतापर्यंतची एकूण कामगिरी

मोबाईल शोध विशेष पथकाने आतापर्यंत केलेल्या कारवाईचा लेखाजोखा अत्यंत प्रभावी राहिला आहे:

अ.क्र.  दिनांक  मोबाईल हँडसेट संख्या   एकूण किंमत

Advertisement

१      १८/०९/२०२५       ६०३               १,१३,००,०००/-

२     ०८/०१/२०२६       ५३५               १,०२,००,०००/-

३      २४/०७/२०२६      ८४८              १,३३,८९,७२२/-

एकूण                         १,९८६           ३,४८,८९,७२२/-

यावरून नाशिक पोलिसांनी आतापर्यंत एकूण १,९८६ मोबाईल शोधून काढले असून, त्यांची एकूण बाजारभावानुसार किंमत ३ कोटी ४८ लाख ८९ हजार ७२२ रुपये इतकी होते.

नागरिकांकडून पोलिसांचे आभार

आज आयोजित केलेल्या ‘हरवलेले मोबाईल सुपूर्द कार्यक्रम’ प्रसंगी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करत पोलीस प्रशासनाच्या तत्परतेबद्दल व कामगिरीबद्दल मनःपूर्वक आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तुषार पाटील यांनी केले.

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) चंद्रकांत गवळी, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ १) मोनिका राऊत, आणि पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ २) किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच ‘मोबाईल शोध विशेष पथकाचे’ प्रमुख संदीप मिटके (सहा. पोलीस आयुक्त - गुन्हे) आणि पथकातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या अथक परिश्रमांमुळे हे यश शक्य झाले असून, हे विशेष पथक भविष्यातही असेच कार्यरत ठेवले जाणार आहे.

Advertisement

Comments

No comments yet.