निफाड तालुक्यात पुराचा तडाखा... चांदोरी, सायखेड्यात ६५० कुटुंबे स्थलांतरित...

Share:
Main Image
Last updated: 24-Jul-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) २४ जुलै - नाशिक जिल्हा आणि धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे गोदावरी नदीची पाणीपातळी प्रचंड वाढली असून, निफाड तालुक्यातील चांदोरी व सायखेडा परिसरात पूरस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार तसेच अप्पर पोलीस अधीक्षक निलोत्मा राव यांनी शुक्रवारी पूरग्रस्त भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली आणि प्रशासनाला मदतकार्य अधिक गतीमान करण्याचे निर्देश दिले.

विशेष म्हणजे, पूरग्रस्त भागात पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी स्वतः ट्रॅक्टरवर बसून बाधित वस्त्यांमध्ये जात नागरिकांशी संवाद साधला व परिस्थितीचा आढावा घेतला.

चांदोरी व सायखेड्यात ६५० कुटुंबे सुरक्षित स्थळी

पुराचा वेढा वाढल्याने स्थानिक प्रशासनाने तातडीने बचावकार्य हाती घेतले आहे:

चांदोरी: पुराचे पाणी गावात शिरल्याने सुमारे ४०० कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले असून, पाण्यामुळे तब्बल १०० दुकाने प्रभावित झाली आहेत.

सायखेडा: २५० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून, १२५ दुकानांमधील मालाचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

बाधित नागरिकांसाठी तात्पुरता निवारा, आरोग्य सेवा, अन्नधान्य, स्वच्छ पिण्याचे पाणी व इतर मूलभूत सुविधा पुरवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. महसूल व ग्रामपंचायत विभागाकडून नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

Advertisement

ओझरखेड धरणातून उनंदा नदीत विसर्ग; नदीकाठच्या गावांना इशारा

पुणेगाव आणि ओझरखेड धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे पालखेड पाटबंधारे विभागाकडून ओझरखेड धरणातून उनंदा नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर पाहता विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी पशुधन, शेतीचे पंप आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असा इशारा कार्यकारी अभियंत्यांनी दिला आहे.

नाशिक शहरात पावसाची उघडीप, पण गंगापूरमधून विसर्ग सुरूच

शुक्रवारी नाशिक शहर परिसरात दिवसभर पावसाने काहीशी उघडीप दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणातून गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे संपूर्ण शासकीय यंत्रणा सतर्क (अलर्ट मोडवर) ठेवण्यात आली आहे.

या पाहणी दौऱ्याप्रसंगी गटविकास अधिकारी नम्रता जगताप, सहाय्यक गटविकास अधिकारी सुनील पाटील, चांदोरीचे सरपंच विनायक खरात यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

"पूरग्रस्त नागरिकांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. स्थलांतरित कुटुंबांना सर्व आवश्यक सुविधा दिल्या जात असून आपत्ती व्यवस्थापन समिती व सर्व संबंधित विभाग समन्वयाने काम करत आहेत."

— ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. नाशिक.

Advertisement

Comments

No comments yet.