नाशिक, (प्रतिनिधी) २४ जुलै - स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फर्मच्या माध्यमातून क्रेडिटवर कच्चा माल खरेदी करून तब्बल १३ लाख २५ हजार ४५४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी भागीदार असलेल्या दोन भावांवर मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
गोविंद नगर येथील मयुर अधिकराव पाटील (वय ४१) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी मयुर पाटील आणि संशयित आरोपी यांची वेगवेगळ्या फर्म्स असून ते एकमेकांचे भागीदार आहेत.
संशयित अमोल सुरेश चौधरी व योगेश सुरेश चौधरी (दोघे रा. रुग्ठा टाऊनशिप, राजीवनगर) यांनी मे २०२५ मध्ये रेल्वेचा एक ठेका मिळवला होता. हे काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी पाटील यांचा विश्वास संपादन केला आणि पाटील यांच्या फर्मच्या माध्यमातून क्रेडिटवर कच्चा माल खरेदी केला.
वर्ष उलटले तरी परतफेड नाही
कच्चा माल खरेदी करून वर्ष उलटून गेले तरी संशयितांनी पैशांची परतफेड केली नाही. ज्या व्यापाऱ्यांकडून कच्चा माल खरेदी केला होता, त्यांनी मयुर पाटील यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावणे सुरू केले. यामुळे पाटील यांनी अमोल आणि योगेश चौधरी यांच्याकडे वारंवार पैशांची मागणी केली, मात्र दोन्ही भावांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मयुर पाटील यांनी मुंबईनाका पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस वरिष्ठ निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.