गोदावरीला मोसमातील सर्वात मोठा पूर... सायखेडा, चांदोरीत पाणी शिरले...

Share:
Main Image
Last updated: 24-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) २४ जुलै - शहर तसेच धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गोदावरी नदीला यंदाच्या मोसमातील सर्वात मोठा पूर आला आहे. गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून, पुराचे पाणी आता निफाड तालुक्यात शिरले आहे. सायखेडा येथील पूल पाण्याखाली गेला असून, चांदोरी गावात पुराचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने व्यापाऱ्यांनी माल सुरक्षित स्थळी हलवला आहे.

दरम्यान, नाशिक शहरातील रामकुंड परिसरातील सर्व लहान-मोठी मंदिरे आणि ऐतिहासिक रामसेतू पूल पाण्याखाली गेला आहे. पुराचे पाणी प्रसिद्ध दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पोहोचले असून, पुराचा वाढता धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गंगापूर धरण ९७ टक्के पूर्ण; विसर्गात वाढ

जिल्ह्यात सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे गंगापूर धरण ९७ टक्के भरले आहे. कश्यपी आणि गौतमी गोदावरी धरणांतून येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने, गंगापूर धरणातून सध्या १३ हजार क्यूसेक वेगाने गोदावरी पात्रात विसर्ग सुरू आहे. धरणातून सोडलेले पाणी रामकुंडापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे ५ तासांचा कालावधी लागतो. पावसाचे पाणी आणि धरणातील विसर्ग मिळून होळकर पुलाखालून सुमारे २४ हजार क्यूसेक वेगाने पाणी वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

भांडी बाजार, सराफ बाजारात पाणी शिरण्याची शक्यता

होळकर पुलाजवळ विसर्ग १९ हजार क्यूसेकवर पोहोचल्यास गोदावरी नदी धोक्याची पातळी ओलांडते. सध्या २४ हजार क्यूसेक वेगाने पाणी वाहत असल्याने पुराचे पाणी नाशिक शहरातील सराफ बाजार व भांडी बाजार परिसरात शिरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

मध्यरात्री जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

पूरपरिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, महापौर हिमगौरी आडके आणि मनपा आयुक्त मनिषा खत्री यांनी मध्यरात्री रामकुंड व पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

"गोदावरी पात्रात पाणी मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. कश्यपी आणि गौतमी गोदावरीतून गंगापूर धरणात पाणी येत असून, तेथून १३ हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे. होळकर पुलाजवळ धोका पातळी १९ हजार क्यूसेक आहे. त्यामुळे सखल भागातील नागरिकांनी खबरदारी बाळगावी."

— आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक.

?s=20

Advertisement

सकारात्मक दिलासा!

नाशिक शहर परिसरात आज सकाळपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला असून, ही नागरिकांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे. मात्र, धरणांमधून होणारा विसर्ग आणि वरच्या भागातील पाऊस यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अतिवृष्टीनंतरही परिस्थिती नियंत्रणात

 

 गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमानाची नोंद होऊनही प्रशासनाने वेळेवर केलेल्या उपाययोजना, विविध यंत्रणांतील प्रभावी समन्वय आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली असून कोणतीही जिवितहानी अथवा मोठी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली नाही. पावसाचा जोर कमी झाला असला तरी संभाव्य धोका अद्याप टळलेला नसल्याने नागरिकांनी सतर्कता कायम ठेवून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रा. देवयानी फरांदे, ॲड.आमदार राहुल ढिकले, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, नाशिक पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, पोलीस उपायुक्त किशोर काळे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, गेल्या तीन दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे काही भागांत पाणी साचणे व स्थानिक स्वरूपाचे नुकसान झाले असले तरी प्रशासनाच्या तातडीच्या प्रतिसादामुळे कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. नागरिकांनी प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य केल्यामुळे मोठी आपत्ती टळली असून त्याबद्दल त्यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले.

आज हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला ग्रीन अलर्ट दिला असला तरी संभाव्य धोका पूर्णपणे संपलेला नाही. ज्या इमारती किंवा परिसरात अद्याप पाणी साचलेले आहे, तेथील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. पावसानंतर डेंग्यू, कॉलरा यांसारख्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने आवश्यक औषधसाठा उपलब्ध ठेवावा. तसेच महानगरपालिका प्रशासनाने स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा यांचे प्रभावी नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळे, धबधबे आणि नदीकाठ परिसरात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस प्रशासनाने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. नागरिकांनीही धोकादायक ठिकाणी जाणे टाळून स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

गोदावरी नदीपात्रात सुमारे 19 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तो सामान्य स्थितीत येण्यास वेळ लागणार  असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रामकुंड परिसर पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रसाद यांनी दिली. या परिसरातील नागरिकांनी तसेच भाविकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महसूल, पोलीस, महानगरपालका व संबंधित यंत्रणांनी परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.