धडक कारवाईने अनेकांचे धाबे दणाणले... अवघ्या ३ महिन्यांत वसूल केले तब्बल ६,९६२ कोटी रुपये...

Share:
Main Image
Last updated: 23-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २३ जुलै - महाराष्ट्रात अवैध दारूची निर्मिती, परराज्यातून होणारी बेकायदेशीर वाहतूक आणि अवैध धाब्यांवरील विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) कारवाईचा धडाका लावला आहे. सराईत गुन्हेगारांवर आखलेल्या प्रतिबंधात्मक रणनीतीमुळे राज्यातील बेकायदेशीर दारू धंद्यांचे कंबरडे मोडले असून, दुसरीकडे शासकीय तिजोरीत महसुलाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे.

२०२५-२६ या आर्थिक वर्षात उत्पादन शुल्क विभागाने २९,९५७.९५ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल गोळा केला असून, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीनच महिन्यांत (१ एप्रिल ते ३० जून २०२६) तब्बल ६,९६२.६९ कोटी रुपयांचा महसूल जमा करण्यात यश मिळवले आहे.

कारवाईचा धडाका: आकडेवारी काय सांगते?

गुन्हे आणि अटक: २०२५-२६ या आर्थिक वर्षात सर्वाधिक ७५,२३२ गुन्हे नोंदवून ६७,५०४ आरोपींना जेरबंद करण्यात आले. या कारवाईत ४,७४८ वाहने आणि २५,४६० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चालू वर्षातील ३ महिन्यांची कामगिरी: १ एप्रिल २०२६ ते ३० जून २०२६ दरम्यान १९,८०४ गुन्हे दाखल करत १८,४९२ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर ७,६२१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे.

Advertisement

हातभट्टीवर विशेष प्रहार: चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत हातभट्टी दारूशी संबंधित ९,१६३ गुन्हे नोंदवून ६,९७१ आरोपींवर कडक कारवाई करण्यात आली.

परराज्य दारू, रसायने आणि धाब्यांवर करडी नजर

परराज्यातील दारू: १ एप्रिल ते ३० जून २०२६ दरम्यान परराज्यातून होणाऱ्या बेकायदेशीर दारू वाहतुकीचे ४६६ गुन्हे नोंदवून ३,८५१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अवैध हॉटेल्स अन् धाबे: याच ३ महिन्यांत बेकायदेशीर मद्यविक्री करणाऱ्या २,६३६ हॉटेल्स व धाब्यांवर धाडी टाकण्यात आल्या.

रसायन जप्ती: चालू वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत ४४ लाख ६८ हजार लिटरहून अधिक दारू निर्मितीचे रसायन जप्त करून मोठे रॅकेट उध्वस्त करण्यात आले.

उत्पादन शुल्क विभागाच्या या सातत्यपूर्ण आणि कठोर मोहिमेमुळे राज्यातील दारू माफियांचे धाबे दणाणले असून गुन्हेगारीला मोठा आळा बसत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.