शालेय शिक्षण क्षेत्रात मोठे बदल... विद्यार्थ्यांना आता... झेडपीच्या शाळांमध्ये...

Share:
Main Image
Last updated: 23-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २३ जुलै - शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील विविध योजनांमधील बांधकाम प्रकल्पांना गती देऊन ते पूर्णपणे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावेत, असे स्पष्ट निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत पुणे येथील शिक्षण आयुक्तालय इमारत, सातारा सैनिकी शाळा, समग्र शिक्षा अभियान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना आणि बालभारती अंतर्गत सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

बैठकीतील महत्त्वाचे निर्णय व निर्देश:
सातारा सैनिकी शाळा आणि सैनिकी प्रशिक्षण: सातारा सैनिकी शाळा हा महाराष्ट्राचा मानबिंदू असून तेथील शैक्षणिक सुविधा प्राधान्याने पूर्ण कराव्यात. तसेच राज्यातील जिल्हा परिषद शाळांतील प्राथमिक विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व आणि राष्ट्रभावना विकसित करण्यासाठी सैनिकी प्रशिक्षणावर आधारित उपक्रम जिल्हानिहाय राबवण्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले. सैनिकी शाळांमधील शुल्क टप्प्याटप्प्याने शून्यावर आणण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यासही सांगितले.
एआय (AI) अभ्यासक्रम: विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) अभ्यासक्रमाचा समाविष्ट करण्यावर भर देण्यात आला.
शिक्षण आयुक्तालय संकुल (पुणे): सर्व विभाग एकाच छताखाली आणण्यासाठी पुणे येथील शिक्षण आयुक्तालयाच्या नव्या एकात्मिक इमारतीसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता तातडीने देण्याच्या सूचना दिल्या.
सौर ऊर्जा आणि वसतिगृह बांधकामे: समग्र शिक्षा अभियान, पीएम-श्री योजना आणि प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाभियानांतर्गत शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रणाली उभारणे व वसतिगृह बांधकामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
आदर्श शाळा योजना व बालभारती: डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना आणि बालभारतीच्या प्रलंबित विकासकामांना गती देऊन प्रशासकीय मान्यता तातडीने पूर्ण करण्याबाबत स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांना आधुनिक व सुरक्षित वातावरण देण्याचा मानस
"विद्यार्थ्यांना आधुनिक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजनांतील विकासप्रकल्पांना सूक्ष्म नियोजनाद्वारे अधिक वेगाने पुढे नेले पाहिजे. सर्व कामांमध्ये गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे."
— दादाजी भुसे, शालेय शिक्षण मंत्री

Advertisement

Comments

No comments yet.