प्रेग्नंसीनंतर असे टोमणे मारायचे... अभिनेत्री अमृता रावराणेने मांडली ग्लॅमर विश्वाची दुसरी बाजू...

Share:
Main Image
Last updated: 22-Jul-2026

पुणे, (प्रतिनिधी) २२ जुलै - चंदेरी दुनियेत काम करणाऱ्या अभिनेत्रींना प्रेग्नंसी आणि त्यानंतर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे अनेकदा कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. वजन वाढल्यामुळे मिळणाऱ्या भूमिका, लोकांचे टोमणे आणि मानसिक दडपण यावर अभिनेत्री अमृता रावराणे हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उघडपणे भाष्य केले आहे. डिलिव्हरीनंतर लोकांच्या टोमण्यांचा सामना कसा केला आणि नवऱ्याच्या भक्कम पाठिंब्यामुळे स्वतःला कसे सावरले, याचा प्रामाणिक अनुभव तिने शेअर केला आहे.

"लोकांचे टोमणे अन् नवऱ्याची भक्कम साथ"

प्रेग्नंसीनंतर शरीरात झालेल्या बदलांबद्दल बोलताना अमृता म्हणाली, "डिलिव्हरीनंतर मी लगेच वर्कआउट केले नाही, त्यामुळे माझ्या वजनासाठी मी कोणालाही दोष देणार नाही. मी एका कोशात गेले होते की आता मी काहीच करू शकत नाही. पण अशा वेळी माझा नवरा माझी ढाल बनून उभा राहिला. 'तू बारीक होत नसलीस तरी रडत बसण्यात अर्थ नाही, तुझ्याकडे आत्मविश्वास असला पाहिजे; तू कशी दिसतेस यापेक्षा स्वतःला कशी प्रेझेंट करतेस हे महत्त्वाचे आहे,' असा सल्ला त्याने मला दिला."

Advertisement

इंडस्ट्रीतील अनुभवांबद्दल सांगताना तिने नमूद केले, "मी कुठे गेले की लोक मला 'अमृता काय झालीस तू? हे काय झालंय तुझं?' असे विचारायचे. तेव्हा मला वाटायचे की तुम्ही मला लहानपणी पाहिले होते, आता मी एक पूर्ण स्त्री आहे. पडद्यावर सडपातळ असणे महत्त्वाचे आहे की चांगलं काम करणे महत्त्वाचे आहे? हा प्रश्न मला नेहमी पडायचा."

मैत्रिणीच्या सल्ल्याने डोळे उघडले; आई होण्याचा निर्णय वेळेत घेतला

करिअरच्या शिखरावर असताना प्रेग्नंसीचा विचार पुढे ढकलणाऱ्या अभिनेत्रींना अमृताने एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान भेटलेल्या मैत्रिणीचा किस्सा सांगताना ती म्हणाली, "ती मैत्रीण मला म्हणाली होती की, तुला आई व्हायचे असेल तर आता थांबू नकोस, करिअरचा विचार नंतर कर. कारण ती स्वतः लीड रोलच्या मोहात अडकल्याने आई होण्याचा निर्णय लांबवत गेली आणि नंतर तिला खूप मोठा संघर्ष करावा लागला." मैत्रिणीच्या या सल्ल्यामुळे अमृताने योग्य वेळी आई होण्याचा निर्णय घेतला.

सध्या अमृता रावराणे 'स्टार प्रवाह' वाहिनीवरील 'पाठराखीण' या मालिकेत 'अंबिका सूर्यवंशी' ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. याआधी तिने 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या लोकप्रिय मालिकेतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.