पुणे, (प्रतिनिधी) २१ जुलै - वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मानवतेला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका २० वर्षीय तरुणीला प्रेमाच्या अन् लग्नाच्या जाळ्यात ओढून मुख्य आरोपीने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. एवढेच नव्हे, तर मुख्य आरोपीने आपल्या इतर तीन मित्रांनाही पीडितेवर अत्याचार करण्यास पाठवल्याची विकृत बाब समोर आली आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चारही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत.
फरहान रिझवान शेख (वय २०), फजल शेख (वय २०), रेहान रिझवान शेख (वय १८) आणि साहिल (वय २०, सर्व रा. विमाननगर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून विश्वासघात
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित २० वर्षीय तरुणीची ओळख आरोपी फरहान रिझवान शेख याच्याशी झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधात झाले. या नात्याचा गैरफायदा घेत फरहानने तरुणीला प्रेमाच्या आणि लग्नाच्या जाळ्यात ओढून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ९ नोव्हेंबर २०२५ ते ३ जून २०२६ या कालावधीत त्याने तरुणीला विविध लॉज आणि फ्लॅटवर नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले.
अश्लील व्हिडीओची धमकी देत मित्रांकडूनही अत्याचार
मुख्य आरोपी फरहान एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने आपल्या इतर तीन मित्रांनाही (फजल, रेहान आणि साहिल) पीडित तरुणीवर अत्याचार करण्यासाठी पाठवले. या काळात आरोपींनी पीडितेचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड केले. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू ठेवला.
अखेर आरोपींच्या या छळाला आणि अत्याचाराला कंटाळून पीडित तरुणीने हिंमत दाखवत वाघोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी चौघांविरुद्ध बलात्कार, ब्लॅकमेलिंग, धमकी देणे यांसह विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करत तातडीने चारही आरोपींना अटक केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून वाघोली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.