नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी) २० जुलै - वैद्यकीय प्रवेश परीक्षा 'नीट' (NEET) मधील कथित पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) आंदोलनापुढे अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली आहे. पोलिसांची बंदी झुगारून हजारो आंदोलक संसदेच्या दिशेने निघाल्यानंतर, केंद्र सरकारने तातडीने आंदोलकांशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत सीजेपीचे (CJP) प्रतिनिधी आशुतोष रांका आणि सौरव दास यांची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे.
CJP च्या शिष्टमंडळाची JP नड्डांशी चर्चा
सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनी ट्विट करत या बैठकीबाबत माहिती दिली. "सकाळी ११:५२ वाजता आम्ही जे. पी. नड्डा यांची भेट घेण्यासाठी निघालो आहोत. सरकारनेच आज सकाळी चर्चेसाठी पुढाकार घेत संपर्क साधला होता. आमच्या मागण्या स्पष्ट आहेत," असे दास यांनी नमूद केले. सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सीजेपी प्रमुख अभिजित दीपके यांनी उपोषणाची कमान सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली आज (२० जुलै) संसदेवर धडक मोर्चा काढण्यात आला.
?s=20
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला!
एकीकडे जे. पी. नड्डा आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत असतानाच, दुसरीकडे एका मोठ्या राजकीय घडामोडीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले आहेत. या बैठकीमुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार का? याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे.
दिल्लीत कडेकोट बंदोबस्त; १५ विभागांत कलम १६३ अन् इंटरनेट बंद
पावसाळी अधिवेशन आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत प्रचंड तणावाचे वातावरण आहे:
सुरक्षा व्यवस्था: संसदेच्या सुरक्षेसाठी ५ हजारांहून अधिक पोलीस आणि सीआयएसएफ (CISF) चे सशस्त्र जवान तैनात करण्यात आले आहेत. आंदोलक आक्रमक झाल्यास रोखण्यासाठी वॉटर गनचे बंब आणि वॉटर कॅनन तैनात आहेत.
कलम १६३ लागू: खबरदारीचा उपाय म्हणून नवी दिल्लीतील १५ पोलीस विभागांमध्ये कलम १६३ (जमावबंदी) लागू करण्यात आले असून संसदेकडे जाणारे सर्व प्रमुख रस्ते सील करण्यात आले आहेत.
इंटरनेट सेवा खंडित: अफवा पसरू नयेत म्हणून जंतर-मंतरसह ३ किलोमीटरच्या परिसरात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सीजेपीने यावर टीका करत "हा आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे," असा आरोप केला आहे.
रात्रभर २० हजार आंदोलक रस्त्यावर
सौरव दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातून आलेले सुमारे २० हजार आंदोलक रात्रभर जंतर-मंतर आणि दिल्लीतील रस्त्यांवर, पदपथांवर ठाण मांडून बसले होते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळातच आंदोलकांनी संसदेच्या अगदी जवळ धडक मारल्याने केंद्र सरकारची मोठी अडचण झाली होती. अखेर सरकारने चर्चेचा मार्ग स्वीकारल्याने या प्रकरणावर काय तोडगा निघतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.