नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १९ जुलै - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) शताब्दी वर्षाचे औचित्य साधून ज्येष्ठ राजकीय नेते तथा नाशिकचे जावई श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी यांनी लिखित "आरएसएस@100: अ सेंचुरी ऑफ सर्विस, युनिटी अँड सॅक्रिफाईस" (RSS@100: A Century of Service, Unity & Sacrifice) या महत्त्वपूर्ण पुस्तकाचे भव्य प्रकाशन झाले. उपराष्ट्रपती भवनात आयोजित एका विशेष समारंभात उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. या ऐतिहासिक सोहळ्याला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष विजेंद्र गुप्ता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
संघाचा प्रवास म्हणजे सांस्कृतिक मूल्यांचे पुनरुज्जीवन: उपराष्ट्रपती
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन म्हणाले की, "माझा संघाशी दीर्घकाळापासून संबंध राहिल्यामुळे या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सहभागी होणे हा माझ्यासाठी वैयक्तिक सन्मान आहे. संघाचा प्रवास हा भारताची सांस्कृतिक मुळे, वारसा आणि परंपरा यांचे पुनरुज्जीवन करणारा, त्यांना बळ देणारा ठरला आहे." पुस्तकाचे शीर्षक 'सेवा, एकता आणि त्याग' या त्रिसूत्रीवर आधारित असून या आदर्शांनी स्वयंसेवकांच्या अनेक पिढ्यांना देशसेवेची प्रेरणा दिली आहे, अशा शब्दांत त्यांनी लेखकांच्या लेखणीचे कौतुक केले.
ठळक मुद्दे:
'स्वयंसेवक' ते 'प्रधान सेवक' प्रवास: पुस्तकातील "अ स्वयंसेवक ॲज पीएम: द मोदी एरा" या प्रकरणाचा विशेष उल्लेख करत उपराष्ट्रपती म्हणाले की, हे पुस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक सामान्य स्वयंसेवक ते देशाचा 'प्रधान सेवक' असा प्रवास प्रभावीपणे उलगडते. पंतप्रधानांच्या 'राष्ट्र प्रथम' या धोरणातून संघाची निःस्वार्थ सेवाच प्रतिबिंबित होते.
शाखांच्या माध्यमातून नेतृत्व विकास: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दैनंदिन शाखांच्या माध्यमातून समाजात उत्तम जडण-घडण आणि नेतृत्व-विकास कसा घडवला जातो, यावरही उपराष्ट्रपतींनी प्रकाश टाकला.
नाशिककरांसाठी अभिमानाची गोष्ट!
या पुस्तकाचे सह-लेखक आणि भाजपचे ज्येष्ठ नेते श्याम जाजू यांचा नाशिकशी अत्यंत जवळचा ऋणानुबंध आहे. ते नाशिकचे जावई आहेत. ९ डिसेंबर १९८७ रोजी त्यांचा विवाह नाशिक येथील प्रतिभा जाजू यांच्याशी झाला होता. त्यांना संदेश जाजू हा मुलगा आणि सोनाली राठी ही मुलगी आहे. त्यामुळे त्यांच्या या वैचारिक आणि ऐतिहासिक पुस्तकाचे थेट उपराष्ट्रपतींच्या हस्ते दिल्लीत प्रकाशन झाल्याने नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, नाशिककरांमधून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
?s=20