मंत्री गुलाबराव पाटलांना VIP दर्शन... आमदार मुनगंटीवार यांना ताटकळत ठेवले... पंढरपुरात विठुरायाच्या मंदिरात नाट्यमय घडामोडी...

Share:
Main Image
Last updated: 19-Jul-2026

पंढरपूर, (प्रतिनिधी) १९ जुलै - आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपुरात लाखो भाविक विठ्ठल दर्शनासाठी दाखल झाले आहेत. सर्वसामान्य वारकऱ्यांना सुलभ आणि वेळेत पदस्पर्श दर्शन मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने १५ जुलैपासून 'व्हीआयपी' दर्शन पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी (बुधवारी) या आदेशाचा पुरता फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. एका मंत्र्यांच्या समर्थकांनी थेट धक्काबुक्की करत मंदिरात प्रवेश केला, तर दुसऱ्या बाजूला माजी मंत्र्यांना मात्र गेटवरच ताटकळत उभे राहावे लागल्याने मंदिर प्रशासनाचा दुजाभाव आणि ढिसाळ नियोजन चव्हाट्यावर आले आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी यात्रा कालावधीत व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार बुधवारी दिवसभर या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, रात्रीच्या वेळी राजकीय नेते आणि मंत्र्यांची पावले व्हीआयपी गेटकडे वळताच तेथील व्यवस्थेचे तीनतेरा वाजले.

मंत्र्यांच्या समर्थकांचा धुडगूस, माजी मंत्र्यांना मात्र खोळंबा
रात्रीच्या सुमारास राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे आपल्या नातेवाईकांसह दर्शनासाठी व्हीआयपी गेटवर आले. यावेळी त्यांना आत सोडण्यावरून सुरक्षारक्षक आणि प्रशासनात बराच वेळ गोंधळ सुरू होता.

याच गोंधळादरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांच्या काही समर्थकांनी तेथील सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की करत मंदिरात जबरदस्तीने प्रवेश केला. याउलट, सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्या नातेवाईकांना मात्र कायदा पाळल्यामुळे गेटवरच ताटकळत उभे राहावे लागले. मंदिर समितीने केलेल्या या पक्षपाती व्यवहारामुळे मंदिर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Advertisement

नेत्यांच्या प्रतिक्रिया:
"आम्ही अडीचशे किलोमीटर दूरवरून आलोय. व्हीआयपी दर्शन बंद असले तरी माझ्यासोबतच्या काही लोकांनी दर्शन घेतले आहे."
— गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा मंत्री

"मंदिर प्रशासनाच्या या पवित्र्यात समन्वयाचा प्रचंड अभाव दिसून येतोय. प्रशासनाने सर्वांना समान न्याय द्यायला हवा होता."
— सुधीर मुनगंटीवार, ज्येष्ठ नेते व माजी मंत्री (नाराजी व्यक्त करताना)

'नेत्यांनी व्हीआयपी दर्शनाचा मोह टाळावा!'
विठ्ठलाच्या दर्शनासाठी सर्वसामान्य वारकरी आणि भाविक २४ ते ३० तास रांगेत उपाशीपोटी उभे राहतात. मात्र, व्हीआयपी व्यक्ती आल्या की ही रांग थांबवली जाते, जी वारकऱ्यांवर अन्याय करणारी आहे. या पार्श्वभूमीवर, "यात्रा काळात मंत्री, अधिकारी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी व्हीआयपी दर्शनाचा मोह स्वतःहून टाळावा," अशी स्पष्ट मागणी वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल काकाजी पाटील यांनी केली आहे.

पहिल्याच दिवशी झालेल्या या गोंधळानंतर आता उर्वरित यात्रा काळात जिल्हा प्रशासन या नियमाची कशी अंमलबजावणी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.