नाशिकमध्ये प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट... होणाऱ्या पतीशी फोन सुरू असतानाच तरुणीचा गळा चिरला...

Share:
Main Image
Last updated: 19-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १९ जुलै - शहरातील इंदिरानगर परिसरात शुक्रवारी रात्री एक अत्यंत धक्कादायक आणि रक्तरंजित थरार घडला. लिव्ह-इन-रिलेशनशिपमधील जुने संबंध तोडून दुसऱ्या तरुणाशी लग्न ठरल्याच्या रागातून एका माथेफिरू प्रियकराने पेइंग गेस्ट (PG) म्हणून राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली. या थरारक हत्येनंतर अवघ्या काही तासांतच, पोलीस पकडतील या भीतीने संशयित आरोपी प्रियकरानेही जॉगिंग ट्रॅक परिसरात झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. अवघ्या काही मिनिटांच्या अंतराने घडलेल्या या दोन मृत्यूंमुळे संपूर्ण नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे. ​वैष्णवी अनिल आवारे (वय २०, मूळ रा. अमळनेर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव असून, साहिल अशोक लाव्हारे (मूळ रा. उमरखेड, जि. यवतमाळ) असे आत्महत्या केलेल्या हल्लेखोर तरुणाचे नाव आहे.

नेमकं काय घडलं? २२ मिनिटांच्या फोनवर ऐकला मृत्यूचा थरार!

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत वैष्णवी आवारे आणि आरोपी साहिल लाव्हारे हे आधी ओळखीचे होते. ते यवतमाळमधील उमरखेड येथे लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. मात्र, काही काळापासून त्यांच्यात वाद झाल्याने वैष्णवी नाशिकला राहण्यास आली होती. ती इंदिरानगर येथील वनसंपदा सोसायटीत पेइंग गेस्ट म्हणून राहत होती. दरम्यान, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिची ओळख नाशिकमधील एका तरुणाशी (तक्रारदार) झाली. वैष्णवीला आई-वडील नसल्याने आणि तिने आपल्या भूतकाळाविषयी स्पष्ट कल्पना दिल्याने, त्या तरुणाने तिच्याशी लग्न करण्याचे ठरवले होते. दोघांच्या लग्नाची बोलणीही अंतिम झाली होती.

या लग्नाची कुणकुण लागताच साहिल संतापाने लाल झाला. त्याने शुक्रवारी रात्री ९ वाजता वैष्णवीच्या होणाऱ्या पतीला फोन करून, "तिला समजावून सांग आणि माझ्याकडे पाठवून दे," अशी धमकी दिली. त्यानंतर रात्री १० वाजेच्या सुमारास साहिल थेट वैष्णवी राहत असलेल्या इंदिरानगर येथील वनसंपदा कॉलनीच्या इमारतीखाली पोहोचला. साहिल तिथे आल्याचे पाहताच घाबरलेल्या वैष्णवीने आपल्या होणाऱ्या पतीला फोन लावला.

Advertisement

​तब्बल २२ मिनिटे हा फोन सुरू होता आणि साहिल-वैष्णवी यांच्यात होणारे जोरदार भांडण तिचा होणारा पती फोनवर ऐकत होता. याच भांडणादरम्यान साहिलने धारदार शस्त्राने वैष्णवीवर हल्ला केला आणि फोनवर "वैशुला आज संपवले!" असा आवाज आला अन् फोन कट झाला. घाबरलेल्या होणाऱ्या पतीने तातडीने घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती आणि तिचा मृत्यू झाला होता.

हत्येनंतर प्रियकराचाही अंत

​वैष्णवीचा खून केल्यानंतर आरोपी साहिल घटनास्थळावरून पसार झाला. इंदिरानगर पोलिसांची पथके त्याचा कसून शोध घेत असतानाच, मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरात एका झाडाला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी धाव घेतली असता, तो मृतदेह मुख्य संशयित आरोपी साहिल लाव्हारे याचाच असल्याचे निष्पन्न झाले. वैष्णवीची हत्या केल्यानंतर पश्चात्ताप किंवा पोलिसांच्या अटकेची भीती यातून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

​या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.