मुंबई, (प्रतिनिधी) १८ जुलै - महिलांचा डिजिटल सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने रिलायन्स फाउंडेशन आणि गेट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘शी-कनेक्ट्स डिजिटल ॲक्सेलरेटर : इंडिया’ या उपक्रमाची मोठी घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यासाठी भारतातील ६ स्वयंसेवी संस्थांची (NGO) निवड करण्यात आली असून, त्यांना २५.८४ कोटी रुपयांची मदत दिली जाईल. या संस्था पुढील १५ ते १८ महिन्यांत आरोग्य, उपजीविका आणि शिक्षणाशी संबंधित डिजिटल उपाययोजनांद्वारे देशातील सुमारे १० लाख महिलांपर्यंत पोहोचणार आहेत.
नवी दिल्लीत आयोजित एका विशेष कार्यक्रमात या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यासाठीच्या अर्ज प्रक्रियेची (RFA) सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाला सरकार, तंत्रज्ञान, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात 'या' ६ संस्थांची निवड:
पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या संस्थांमध्ये PCI इंडिया, एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन, मैना महिला फाउंडेशन, डिजिटल एम्पॉवरमेंट फाउंडेशन, ASPIRE आणि चैतन्य यांचा समावेश आहे. या संस्था ग्रामीण महिला, स्वयं-सहाय्यता बचत गट, महिला उद्योजक तसेच किनारी भागातील महिलांसाठी डिजिटल कौशल्य आणि आरोग्य सेवा विकसित करणार आहेत.
"महिलांना डिजिटल विश्वात आत्मविश्वास आणि संधी देणे हे सर्वसमावेशक भविष्यासाठी आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यात व्यापक स्तरावर काम करण्याची क्षमता असलेल्या भागीदार संस्था आमच्यासोबत जोडल्या गेल्याचा आनंद आहे."
— दीप्ती रेड्डी (प्रमुख, महिला सक्षमीकरण विभाग, रिलायन्स फाउंडेशन)
दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन; AI आणि चॅटबॉटवर भर
या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी भारतीय स्वयंसेवी संस्थांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत ४ सप्टेंबर २०२६ आहे. निवड झालेल्या प्रत्येक प्रकल्पाला ४.२ कोटी रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिले जाईल. या टप्प्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), चॅटबॉट आणि प्रादेशिक भाषांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांची डिजिटल पोहोच वाढविणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जाईल.