नाशिक, (प्रतिनिधी) ३ सप्टेंबर - यावर्षी पावसाने घेतलेली ओढ शेतीसाठी नक्कीच चिंताजनक असली, तरी ही परिस्थिती स्थानिक वनस्पती आणि निसर्ग संवर्धनासाठी एक सुवर्णसंधी ठरू शकते, असा नवा दृष्टिकोन नाशिकमधील 'आपलं पर्यावरण' संस्थेने मांडला आहे. यंदा कमी पाऊस असल्यामुळे नवीन वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवण्याऐवजी, आतापर्यंत लावलेली रोपे जगवणे आणि निसर्गाला घातक ठरणाऱ्या आक्रमक परदेशी वनस्पती मुळासकट उपटून टाकणे हेच खरे पर्यावरण संवर्धन ठरेल, असे आवाहन संस्थेचे प्रमुख शेखर गायकवाड यांनी केले आहे.
परदेशी वनस्पतींचे 'आक्रमण' रोखण्याची हीच वेळ
गेल्या चार-पाच वर्षांत झालेल्या सातत्यपूर्ण आणि अतिवृष्टीमुळे जंगले, डोंगरदऱ्या आणि शेतजमिनींवर घाणेरी (Lantana), रानमारी, कॉसमॉस, रानतुळस, टिकोमा यांसारखी झुडपे आणि सुबाभूळ, अकेशिया, ग्लिरिसिडिया (उंदीरमारी) यांसारख्या परदेशी वृक्षप्रजातींनी वेगाने आपले साम्राज्य निर्माण केले आहे. या परदेशी वनस्पती स्थानिक झाडांचे पाणी, सूर्यप्रकाश आणि जमिनीतील पोषकद्रव्ये शोषून घेत असल्याने नाशिकची मूळ जैवविविधता धोक्यात आली आहे.
यंदा सुरुवातीला कमी पाऊस झाल्याने या वनस्पतींची रोपे अजून प्राथमिक अवस्थेत आहेत आणि माती भुसभुशीत असल्याने त्यांना समूळ उपटणे सोपे आहे. त्यामुळे श्रमदानातून या वनस्पतींचे उच्चाटन करण्यासाठी हीच सर्वात योग्य वेळ आहे.
'परिसंस्था पुनर्स्थापना' (Restoration Ecology) काळाची गरज
नवीन वृक्षलागवड करण्यापेक्षा अस्तित्वात असलेला नैसर्गिक अधिवास सुरक्षित करणे अधिक परिणामकारक ठरते. नाशिक देवराई आणि नाशिक वनराई येथे गेल्या काही वर्षांत 'आपलं पर्यावरण' संस्थेने अशा आक्रमक परदेशी वनस्पती हटवून स्थानिक प्रजातींचे संवर्धन केले, ज्याचे अतिशय सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. आक्रमक प्रजाती हटवताच अनेक स्थानिक दुर्मिळ वनस्पती नैसर्गिकरीत्या पुन्हा उगवू लागतात आणि निसर्गाचा समतोल पुनर्स्थापित होतो.
"दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक संस्था आणि समूहांचे वृक्षारोपणासाठी फोन येत आहेत. मात्र, यंदा पाऊस कमी असल्याने माझे सर्वांना नम्र आवाहन आहे की, नवीन रोपे लावण्यापेक्षा कृपया घरून पाच लिटरची पाण्याची कॅन घेऊन या आणि आधीच लावलेल्या रोपांना पाणी देऊन त्यांना जीवनदान देण्याच्या मोहिमेत सहभागी व्हा."
— शेखर गायकवाड, आपलं पर्यावरण संस्था, नाशिक
...तरच निसर्ग जगेल!
यंदा पर्यावरण संवर्धनाची दिशा बदलण्याची गरज असून नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी आणि तरुण मंडळांनी केवळ खड्डे खोदून नवीन रोपे लावण्याचा अट्टहास धरू नये. लावलेली झाडे जगवणे, त्यांचे संगोपन करणे आणि स्थानिक जंगलांना परदेशी वनस्पतींपासून मुक्त करणे या त्रिसूत्रीवर काम करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.
इच्छुक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी किंवा श्रमदानासाठी ९४२२२६७८०१ किंवा ९१३०२५७८०१ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.