गुवाहाटी, (वृत्तसंस्था) १६ जुलै - गुवाहाटीमध्ये एका भिकाऱ्याने सर्वांच्या डोळ्यात धूळफेक करत तस्करीचे एक मोठे साम्राज्य उभे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिव्यांग भिकारी बनून फिरणाऱ्या या व्यक्तीकडे तब्बल ५४ कोटी रुपयांचे सोने असल्याचे पोलिसांच्या छाप्यात उघड झाले आहे. हा आरोपी मूळचा महाराष्ट्रातील सांगलीचा असून, या घटनेमुळे संपूर्ण ईशान्य भारतात खळबळ उडाली आहे.
दिव्यांग भिकाऱ्याचा मुखवटा आणि तस्करीचे सत्य
आरोपीचे नाव अक्षय परशुराम बनसोडे (३२) असे असून तो मूळचा सांगलीचा रहिवासी आहे. पोलिसांच्या तपासात असे समोर आले की, लोकांचा संशय येऊ नये म्हणून अक्षय गुवाहाटीमध्ये दिव्यांग भिकारी बनून फिरत असे. मात्र, पडद्यामागून तो अत्यंत सक्रियपणे म्यानमारमार्गे भारतात सोन्याची तस्करी करत होता. त्याने गुवाहाटीच्या गांधी बस्ती परिसरात घर भाड्याने घेतले होते आणि त्याच आडून तो आपले तस्करीचे जाळे चालवत होता.
छाप्यात ३७ किलो सोन्याचा साठा जप्त
गुवाहाटी पोलीस आयुक्तालयातील 'स्पेशल ऑपरेशन ग्रुप' आणि 'लतासिल' पोलीस ठाण्याने २९ जून रोजी खारघुली येथील एका घरावर संयुक्त छापा टाकला. या कारवाईत पोलिसांच्या हाताला जे लागले, ते पाहून त्यांचेही डोळे विस्फारले. पोलिसांना घरातून ३७.०६४ किलो सोन्याच्या विटांचे तुकडे सापडले. या सोन्याची बाजारभावानुसार किंमत ५४ कोटी रुपये इतकी आहे. तसेच १३ ग्रॅम चांदी, ३७५५ रुपये रोख रक्कम आणि तस्करीसाठी वापरले जाणारे चार मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केले आहेत.
ईशान्य भारतातील सर्वात मोठी कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, ईशान्य भारताच्या इतिहासातील सोन्याच्या तस्करीविरुद्धची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. जप्त केलेले सर्व सोने २४ कॅरेट शुद्ध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीचे आंतरराष्ट्रीय सोने तस्करीच्या नेटवर्कशी, विशेषतः मिडिल ईस्ट आणि म्यानमारमधील तस्करांशी थेट संबंध असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे.
पोलीस यंत्रणा अलर्ट
अक्षय बनसोडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. या तस्करीच्या नेटवर्कमध्ये नेमके कोण कोण सहभागी आहे आणि हे सोने भारतातून कुठे वितरीत केले जात होते, याचा छडा पोलीस लावत आहेत. या कारवाईमुळे महाराष्ट्रातील सांगली ते गुवाहाटी असा तस्करीचा एक मोठा मार्ग समोर आला आहे.