कुंभमेळ्यासाठी ४,३०० उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण... ३ मोठे सामंजस्य करार...

Share:
Main Image
Last updated: 16-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १६ जुलै - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कौशल्य शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. याच धर्तीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातील युवकांना, विशेषतः आदिवासी व दुर्गम भागातील तरुणांना आधुनिक कौशल्य प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, प्रतिपादन कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे फोर्ट येथील एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यातील कौशल्य विकासाला बळकटी देणाऱ्या अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला.

वर्ल्ड बँकच्या साहाय्याने 'दक्ष' प्रकल्पाचा शुभारंभ

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (ITI) प्रशिक्षकांसाठी 'दक्ष' प्रकल्पांतर्गत ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात २४० प्रशिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

अभ्यासक्रम: अॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिक व्हेईकल (EV), सीएनसी मशीनिंग, वेल्डर, एरोनॉटिकल स्ट्रक्चर, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग.

उद्योगांचे सहकार्य: या प्रशिक्षणासाठी महिंद्रा अँड महिंद्रा आणि लार्सन अँड टुब्रो (L&T) यांसारख्या दिग्गज कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय रोजगारासाठी ३ सामंजस्य करार

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी SEEID आणि 2 COMS Consulting, Border Plus Technology तसेच Quess International Services या कंपन्यांसोबत ३ महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले. याअंतर्गत विद्यार्थ्यांना भाषा प्रशिक्षण, प्रस्थानपूर्व प्रशिक्षण, कागदपत्रांची पूर्तता आणि प्लेसमेंटनंतरचे सहाय्य दिले जाईल.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुशल मनुष्यबळ

Advertisement

नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सेवांसाठी कुशल मनुष्यबळ तयार केले जाणार आहे. यासाठी 'सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन'ला ४,००० उमेदवारांच्या पूर्वकौशल्य ज्ञान प्रमाणीकरणाचे (RPL) आणि ३०० उमेदवारांच्या अल्पमुदती कौशल्य प्रशिक्षणाचे इरादा पत्र देण्यात आले. यामध्ये हॉस्पिटॅलिटी, रिटेल, ऑटोमोबाईल, बांधकाम, आरोग्य सेवा आणि पर्यटन क्षेत्राचा समावेश असेल.

विजेत्यांना लाखांची बक्षिसे!

'वर्ल्डस्किल्स शांघाय २०२६' स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्रातील ५ राष्ट्रीय विजेत्यांचा रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यास ५ लाख रुपये, रौप्य पदकासाठी ३ लाख आणि कांस्य पदकासाठी २ लाख रुपये रोख बक्षीस देण्याची घोषणा मंत्री लोढा यांनी केली.

हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार आणि नवीन केंद्रांची घोषणा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय ITI (मुंबई-१) येथील 'इंटरनेट ऑफ थिंग्ज' (IoT) अभ्यासक्रमादरम्यानच नोकरीसाठी निवड झालेल्या ११ प्रशिक्षणार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

ग्रामीण भागात दर्जेदार कौशल्य विकासासाठी 'महात्मा ज्योतिबा फुले कौशल्य प्रशिक्षण केंद्र' योजनेअंतर्गत दोन नवीन संस्थांना इरादा पत्रे देण्यात आली.

ITI संस्थांना इनडोअर जिम आणि क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल 'स्नेहधारा चॅरिटी कौन्सिल'चा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाला अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, कौशल्य विकास आयुक्त अमित सैनी, संचालक सतीश सूर्यवंशी यांच्यासह उद्योजक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.