मुंबई, (प्रतिनिधी) १६ जुलै - भगवान जगन्नाथ यांच्या जगप्रसिद्ध रथयात्रेनिमित्त पुरी येथे देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनने यंदा व्यापक सेवा अभियान सुरू केले आहे. १५ ते २७ जुलै २०२६ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या विशेष उपक्रमांतर्गत सुमारे २० लाखांहून अधिक भाविकांसाठी मोफत सात्त्विक भोजन, सुरक्षित पिण्याचे पाणी, पोलीस मदत केंद्रे आणि स्वच्छता मोहिमेसह विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
लोकांची सेवा हाच जगन्नाथांचा खरा मार्ग: अनंत अंबानी
रिलायन्स फाउंडेशनने यंदाच्या अभियानाची व्याप्ती कमालीची वाढवली आहे. या सेवाकार्याविषयी बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी म्हणाले, “पुरी रथयात्रा हा कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा महाउत्सव आहे. येथे येणारे भाविक, कायदा-सुव्यवस्था राखणारे पोलीस कर्मचारी आणि सेवेत कार्यरत प्रत्येक व्यक्तीची सेवा करण्याची संधी मिळणे, हे आमच्यासाठी भाग्याचे आहे. लोकांची सेवा करणे, हेच भगवान जगन्नाथांच्या सेवेचे खरे स्वरूप आहे.”
५० किमीच्या मार्गावर ९० पोलीस मदत केंद्रे
रिलायन्स फाउंडेशनने दिलेल्या माहितीनुसार, रथयात्रेच्या ५० किलोमीटरहून अधिक लांबीच्या प्रमुख मार्गावर प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी सुमारे ९० पोलीस मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. या संपूर्ण परिसरात सेवा कार्यांचे अधिक प्रभावी समन्वयन करण्यासाठी 'जीआयएस' (GIS) आधारित डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे. तसेच फाउंडेशनचे शेकडो स्वयंसेवक भाविकांना आवश्यक मार्गदर्शन आणि मदत करण्यासाठी रस्त्यावर तैनात करण्यात आले आहेत.
पोलीस कर्मचाऱ्यांचीही घेतली जाणार काळजी
रथयात्रेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था चोख राखण्यासाठी अहोरात्र ड्युटीवर तैनात असलेल्या सुमारे १,००० पोलीस कर्मचाऱ्यांनाही रिलायन्स फाउंडेशनतर्फे विशेष सहाय्य दिले जाणार आहे. या कर्मचाऱ्यांना शिफ्टनिहाय पिण्याचे शुद्ध पाणी, ओआरएस (ORS) पाकिटे, हलका अल्पोपहार आणि इतर आवश्यक सोयी-सुविधा पुरवण्यात येत आहेत. स्थानिक प्रशासन आणि संस्थांना सहकार्य करत संपूर्ण रथयात्रा सोहळा अधिक सुरक्षित, स्वच्छ आणि सुव्यवस्थित पार पाडणे, हाच या भव्य अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे रिलायन्स फाउंडेशनने स्पष्ट केले आहे.