नाशिक, (प्रतिनिधी) १५ जुलै - पतीच्या नावावर कारखाना करणे आणि नवीन व्यवसायासाठी माहेरून ५० लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी एका विवाहितेचा अमानुष छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संशयित सासरच्या मंडळींनी विवाहितेचे स्त्रीधन बळजबरीने काढून घेत तिला आणि मुलांना मध्यरात्री घराबाहेर हाकलून दिले. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली असून, अंबड पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन वर्षांपासून सुरू होता छळ
मिळालेल्या माहितीनुसार, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका विवाहितेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. ही महिला जुना गंगापूर नाका (गंगापूर रोड) भागात सासरच्या लोकांसोबत राहत असताना २२ एप्रिल २०२२ ते ९ मार्च २०२५ या कालावधीत हा छळ सुरू होता.
पीडितेच्या वडिलांचा अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये (MIDC) वडिलोपार्जित कारखाना आहे. हा कारखाना पतीच्या नावावर करावा आणि पतीला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून ५० लाख रुपये रोख आणावेत, यासाठी पती, सासू, सासरे, दीर, नणंद आणि नंदोई यांनी विवाहितेमागे तगादा लावला होता.
स्त्रीधन हिसकावून मध्यरात्री हकालपट्टी
सासरच्या मंडळींनी विवाहितेला दमदाटी करत "जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुला आमच्या घरात राहण्याचा अधिकार नाही; तुझा आणि तुझ्या मुलांचा खर्च कोण करणार?" असा जाब विचारत तिचा मानसिक व शारीरिक छळ केला.
एवढ्यावरच न थांबता, संशयितांनी तिच्या अंगावरील आणि ताब्यातील संपूर्ण स्त्रीधन (दागिने व मौल्यवान वस्तू) बळजबरीने काढून घेतले आणि तिला मुलांसह मध्यरात्रीच्या सुमारास घरातून हाकलून दिले.
अखेर पोलिसात धाव
सासरच्या लोकांनी विवाहितेला पुन्हा नांदवून घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने, अखेर कोणताच मार्ग न उरल्याने पीडित महिलेने अंबड पोलीस ठाणे गाठून न्याय मागितला. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून सासरच्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शेख करत आहेत.