मनोहर शिंदे, (नाशिक) १५ जुलै - आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या नियोजनात आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने मोठे पाऊल उचलले आहे. कुंभमेळ्याशी संबंधित संवेदनशील स्थळांवरील भूस्खलनाच्या (Landslide) संभाव्य धोक्याचे शास्त्रीय मूल्यमापन करण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग (GSI) आणि कुंभमेळा प्राधिकरणाची उच्चस्तरीय तांत्रिक बैठक येत्या २३ जुलै रोजी होणार आहे. या बैठकीसाठी जीएसआय, नागपूरचे प्रादेशिक संचालक नाशिकमध्ये येत आहेत.
'सुपर एल-निनो'चे सावट; बहुविध आपत्ती व्यवस्थापन दृष्टिकोन
शास्त्रज्ञांनी २०२७ मध्ये 'सुपर एल-निनो' परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे सरासरी तापमानात वाढ होण्यासोबतच अतिवृष्टीच्या (Cloudburst) घटना वाढू शकतात, ज्यामुळे पूर आणि भूस्खलनाचा धोका अधिक आहे. हीच बाब लक्षात घेऊन कुंभमेळा प्राधिकरणाने 'बहुविध आपत्ती व्यवस्थापन' (Multi-Hazard Disaster Risk Management) दृष्टिकोन स्वीकारला आहे. कुंभमेळ्याच्या आराखड्यात १७ संभाव्य आपत्ती निश्चित करण्यात आल्या असून, त्यात भूस्खलन हा अत्यंत महत्त्वाचा धोका मानला गेला आहे.
या ८ महत्त्वाच्या ठिकाणांचा होणार सविस्तर अभ्यास
भाविकांची संभाव्य गर्दी, डोंगराळ भूप्रदेश आणि पावसाळ्यातील धोका लक्षात घेऊन प्राथमिक स्तरावर खालील स्थळांची निवड करण्यात आली आहे:
1
समृद्धी महामार्ग बोगदा परिसर
वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा
महामार्गावरील बोगद्याच्या परिसरातील डोंगराळ भागाची तपासणी केली जाईल.
2
कसारा घाट
मुंबई-नाशिक मुख्य जोडणारा मार्ग
पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा इतिहास असलेल्या कसारा घाटाचे वैज्ञानिक मूल्यमापन होणार.
3
हरसुल रोड
दिंडोरी रोड ते त्र्यंबकेश्वर मार्ग
या पर्यायी आणि महत्त्वाच्या मार्गावरील डोंगराळ भागाचा अभ्यास केला जाईल.
4
कोळंबिका देवी ट्रस्ट परिसर व नील पर्वत
त्र्यंबकेश्वर येथील धार्मिक स्थळे
भाविकांची मोठी गर्दी होणाऱ्या या डोंगराळ देवस्थान परिसराची सुरक्षितता तपासली जाईल.
5
घोटी-त्र्यंबकेश्वर व त्र्यंबकेश्वर-जव्हार मार्ग
महत्त्वाचे संपर्क रस्ते
डोंगर फोडून तयार केलेल्या या घाटरस्त्यांची तांत्रिक पाहणी केली जाईल.
6
सापुतारा मार्ग
गुजरातहून येणाऱ्या भाविकांचा मार्ग
गुजरात सीमेला जोडणाऱ्या या वळणावळणाच्या घाटरस्त्याचे सर्वेक्षण केले जाईल.
'रॅपिड साइट-स्पेसिफिक लँडस्लाईड असेसमेंट'ची मागणी
कुंभमेळा प्राधिकरणाने 'जीएसआय'कडे तातडीने रॅपिड साइट-स्पेसिफिक लँडस्लाईड असेसमेंट (Rapid Site-Specific Landslide Assessment) करण्याची आणि दीर्घकालीन प्रतिबंधात्मक उपाययोजना सुचवण्याची विनंती केली आहे. २३ जुलैच्या बैठकीत प्रत्यक्ष पाहणीचा आराखडा, भूवैज्ञानिक अभ्यासाची कार्यपद्धती आणि तज्ज्ञांच्या क्षेत्रीय पाहणीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
भाविकांची सुरक्षितता हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य!
"हवामान बदलामुळे नैसर्गिक आपत्तींचे स्वरूप बदलत आहे. त्यामुळे संभाव्य धोक्यांचे वेळेपूर्वी शास्त्रीय मूल्यमापन करणे आवश्यक आहे. 'जीएसआय'च्या तांत्रिक सहकार्यामुळे भूस्खलनाच्या दृष्टीने संवेदनशील स्थळांची अचूक ओळख होईल. शास्त्रीय माहिती आणि तज्ज्ञ संस्थांच्या समन्वयातून आम्ही एक सुरक्षित, सक्षम आणि आपत्ती प्रतिरोधक सिंहस्थ कुंभमेळा उभारण्यास कटिबद्ध आहोत."
— शेखर सिंह (कुंभमेळा आयुक्त, नाशिक)