उद्योगांच्या समस्या 'एकाच छताखाली' सुटणार... नाशिकमध्ये १७ जुलैला या विशेष कार्यक्रमाचे आयोजन...

Share:
Main Image
Last updated: 15-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १५ जुलै - "जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या उद्योगांच्या विविध शासकीय विभागांशी संबंधित अडचणींचे समन्वयातून त्वरित निराकरण करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे 'संकल्प ते सिद्धी' या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकमध्ये गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी आणि उद्योगवाढीस पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी सर्व औद्योगिक संघटना व उद्योजकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे," असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावरील सभागृहात शुक्रवार, दिनांक १७ जुलै २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत हा उद्योगाभिमुख मेळावा पार पडणार आहे. या उपक्रमाच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी 'निमा'चे अध्यक्ष आशिष नाहर, 'आयमा'चे अध्यक्ष राजेंद्र पानसरे, निमाचे प्रतिनिधी मनीष रावल, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स (MACCIA) चे प्रतिनिधी मिलिंद राजपूत, कल्पेश लोया व रवींद्र झोपे, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी प्रशांत पाटील आणि केपीएमजीचे सल्लागार अक्षय भोईटे उपस्थित होते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवादाची सुवर्णसंधी

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, जिल्हा गुंतवणूक परिषदेत सामंजस्य करार (MoU) केलेल्या उद्योगांसह जिल्ह्यातील सर्व उद्योजकांना या उपक्रमात सहभागी होता येईल. उद्योगांना विविध शासकीय विभागांशी संबंधित प्रलंबित प्रकरणे, आवश्यक परवानग्या, पायाभूत सुविधा, वीज, पाणी, बँकिंग, पर्यावरणविषयक बाबी तसेच इतर अडचणींबाबत संबंधित विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्वरित निराकरण करून घेता येणार आहे. या मेळाव्यात सर्व प्रमुख शासकीय विभागांचे प्रमुख एकाच छताखाली उपस्थित राहून अडचणी सोडवतील.

१४ हजार कोटींच्या करारांना गती देणार: आशिष नाहर

Advertisement

"उद्योग हा नाशिकच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उद्योग कुंभाच्या माध्यमातून सुमारे १४ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) झाले आहेत. आता या करारांचे प्रत्यक्ष उद्योगांमध्ये रूपांतर होणे आवश्यक असून, त्यासाठी प्रशासनाने आयोजित केलेला ’संकल्प ते सिद्धी’ मेळावा अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण ठरेल," असा विश्वास 'निमा'चे अध्यक्ष आशिष नाहर यांनी व्यक्त केला.

'संकल्प ते सिद्धी' मेळावा: महत्त्वाचे

केव्हा: शुक्रवार, १७ जुलै २०२६ (सकाळी १०:०० ते दुपारी १:००)

कुठे: तळमजला सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक.

कोणासाठी: जिल्ह्यातील सर्व लघु, मध्यम, मोठे उद्योजक आणि औद्योगिक संघटना.

फायदा: परवानग्या, वीज, पाणी, बँकिंग आणि प्रलंबित प्रशासकीय कामांचे एकाच ठिकाणी तत्काळ निवारण.

Advertisement

Comments

No comments yet.