भावली धरण परिसर असुरक्षित? पर्यटकांना वेढा, कुटुंबावर जीवघेणा हल्ला, विनयभंग आणि लूटमार...

Share:
Main Image
Last updated: 14-Jul-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) १४ जुलै - पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या इगतपुरी तालुक्यातील भावली धबधबा परिसरात फिरण्यासाठी आलेल्या नाशिक रोड येथील एका पर्यटक कुटुंबावर सात जणांच्या टोळीने विनयभंग, लूटमार करत थेट ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना रविवारी घडली. या थरारक घटनेने पर्यटन क्षेत्रातील महिला व कुटुंबांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, मंगळवारी पोलिसांनी याप्रकरणी मोठी कारवाई करत एकूण ९ जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

शिट्ट्या वाजवण्यावरून वाद अन् कारचा थरारक पाठलाग!

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पूनम भागवत (वय ४४, रा. महालक्ष्मी सोसायटी, नाशिक रोड) या पती किरण भागवत व इतर कुटुंबीयांसह रविवारी भावली खुर्द येथील धबधबा पाहण्यासाठी गेल्या होत्या. तेथे उपस्थित असलेल्या दोन टवाळखोर तरुणांनी महिलांकडे पाहून हुल्लडबाजी करत शिट्ट्या वाजवल्या. या गैरवर्तनाबाबत किरण भागवत यांनी जाब विचारताच संतापलेल्या टोळीने इतर साथीदारांना बोलावून भागवत कुटुंबाला दमदाटी व धक्काबुक्की केली.

वाद वाढू नये म्हणून भागवत कुटुंब कारमधून नाशिककडे जाण्यास निघाले. मात्र, संशयितांनी पांढऱ्या रंगाची बलेनो कार (एमएच ४६ बीई ३७२१) आणि मोटारसायकल (एमएच १५ केए ४५०२) वरून त्यांचा थरारक पाठलाग सुरू केला.

रोड रेज: महामार्गावर गाठून लोखंडी रॉडने हल्ला!

घोटी टोल नाक्याच्या पुढे मुंबई-आग्रा महामार्गावर संशयितांनी भागवत कुटुंबाची कार अडवली. गाडी थांबताच टोळीने हातात असलेल्या काठ्या, बेसबॉल स्टिक आणि लोखंडी रॉडने कारच्या काचा फोडल्या. यावेळी आरडाओरड करणाऱ्या महिलांचा विनयभंग करण्यात आला.

Advertisement

तसेच, पूनम भागवत यांची जाऊ कोमल भागवत यांचा दीड लाख रुपये किमतीचा महागडा मोबाईल आणि किरण भागवत यांच्या गळ्यातील सुमारे दोन तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून गुंड पसार झाले. किरण भागवत यांच्यावर बेसबॉल स्टिकने गंभीर वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

?s=20

दहशतीमुळे पीडित कुटुंब घाबरले!

या जीवघेण्या हल्ल्यामुळे भागवत कुटुंब इतके प्रचंड घाबरले होते की, ते सुरुवातीला 'स्पॉट पंचनामा' करण्यासाठी घटनास्थळी येण्यासही तयार नव्हते. अखेर इगतपुरीचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी कुटुंबाला पूर्ण सुरक्षेची हमी दिल्यानंतर, सोमवारी (दि. १३) सायंकाळी पीडित कुटुंब घटनास्थळी आले आणि त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.

पोलिसांची मोठी कारवाई; ९ जण गजाआड!

या संवेदनशील प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत इगतपुरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर आज मंगळवारी पोलिसांनी एकूण ९ संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. या टोळीतील आणखी काही जणांना पोलीस अटक करण्याची दाट शक्यता आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक कांचन भोजणे आणि गोपनीय पोलीस नीलेश देवराज करत आहेत.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.