तरुणांनो तयारीला लागा... २० जुलैपासून भव्य 'अग्निवीर' सैन्य भरती मेळावा...

Share:
Main Image
Last updated: 14-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १४ जुलै - मुंबई सैन्य भरती कार्यालयांतर्गत (ARO) येत्या २० जुलै २०२६ पासून अग्निवीर सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंब्रा (ठाणे) येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियमवर हा मेळावा पार पडणार असल्याची अधिकृत घोषणा मुंबई सैन्य भरती कार्यालयाने केली आहे.

या ८ जिल्ह्यांतील उमेदवारांना सुवर्णसंधी

या भरती मेळाव्यात महाराष्ट्रातील खालील ८ जिल्ह्यांतील पात्र उमेदवार सहभागी होऊ शकणार आहेत:

नंदुरबार

धुळे

नाशिक

ठाणे

पालघर

मुंबई शहर

मुंबई उपनगर

रायगड

'सीईई' परीक्षेचा निकाल लवकरच; संकेतस्थळावर लक्ष ठेवण्याचे आवाहन

Advertisement

अग्निपथ योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षेचा (CEE) निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाच या भरती मेळाव्यात प्रवेश मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना शारीरिक योग्यता चाचणी (PFT), शारीरिक मापन चाचणी (PMT), वैद्यकीय तपासणी आणि इतर प्रक्रियांसाठी ऑनलाइन प्रवेशपत्रे (Admit Cards) जारी केली जातील. उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या अधिकृत संकेतस्थळाला (joinindianarmy.nic.in) नियमित भेट द्यावी, तसेच आपला नोंदणीकृत ई-मेल आणि मोबाईल क्रमांक तपासत राहावा, असे आवाहन लष्कराने केले आहे.

कागदपत्रे आधीच तयार ठेवा

मेळाव्याच्या ठिकाणी होणारी धावपळ आणि गैरसोय टाळण्यासाठी उमेदवारांनी आपली सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे वेळेपूर्वीच तयार ठेवावीत. यामध्ये प्रामुख्याने:

शैक्षणिक प्रमाणपत्रे

रहिवासी प्रमाणपत्र (डोमासाइल)

जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

चारित्र्य प्रमाणपत्र

प्रवेशपत्रात (Admit Card) नमूद केलेली इतर सर्व कागदपत्रे

महत्त्वाची सूचना: उमेदवारांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावरील सूचनांचे काटेकोर पालन करावे. प्रवेशपत्रावर दिलेल्या तारखेला आणि वेळेतच हजर राहणे बंधनकारक आहे. इतर कोणत्याही दिवशी उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही.

दलालांपासून सावधान! भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक

सैन्यात भरती करून देण्याचा खोटा दावा करणाऱ्या अप्रामाणिक व्यक्ती किंवा दलालांच्या आमिषाला बळी पडू नये, असा कडक इशारा लष्कराने दिला आहे. सैन्यातील भरती प्रक्रिया ही संपूर्णपणे संगणकीकृत, निष्पक्ष, पारदर्शक आणि केवळ गुणवत्तेवर आधारित आहे. कोणत्याही बाह्य घटकाचा या निवड प्रक्रियेवर प्रभाव पडू शकत नाही. त्यामुळे उमेदवारांनी सतर्क राहून केवळ आपल्या शारीरिक आणि वैद्यकीय तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित करावे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.