मोशी-चाकण दुर्घटना... आयुक्त सूर्यवंशी, संजय कुलकर्णींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा...

Share:
Main Image
Last updated: 13-Jul-2026

पुणे, (प्रतिनिधी) १३ जुलै -  "मोशी-चाकण येथील दुर्घटनेला पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त सूर्यवंशी आणि प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी यांचे अक्षम्य दुर्लक्ष आणि कंत्राटदार कंपनीसोबतचे हितसंबंध कारणीभूत आहेत. या दोघांसह अँटोनी लारा कंपनीवर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी," अशी घणाघाती मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या प्रा. सुषमा अंधारे यांनी केली आहे. दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची आणि जखमींची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर अंधारे यांनी प्रशासनाचा भोंगळ कारभार आणि राजकीय साटेलोटे चव्हाट्यावर आणले.

अधिवेशनामुळे मृतांचा आकडा लपवण्याचा प्रयत्न?

"अपघात झाल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना तातडीने बाहेर काढणे आवश्यक होते. मात्र, सुरुवातीला केवळ एक ते दोन जेसीबी वापरण्यात आले. शुक्रवारी विधिमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर अचानक १५ जेसीबी कामाला लावण्यात आले. अधिवेशन सुरू असेपर्यंत मृतांचा आकडा बाहेर येऊ नये, यासाठीच बचावकार्यात ठरवून दिरंगाई करण्यात आली का?" असा खळबळजनक सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. कुदळवाडी-जाधववाडीत अनधिकृत बांधकामे पाडताना १०० जेसीबी लावणारे प्रशासन, येथे मानवी जीव वाचवण्यासाठी ४ दिवस का लावते, असाही टोला त्यांनी लगावला.

सुषमा अंधारे यांनी उपस्थित केलेले गंभीर मुद्दे:

अनधिकृत बांधकाम: दुर्घटनाग्रस्त तीन मजली इमारतीपैकी पालिकेने फक्त तळमजल्याला परवानगी दिली होती. मग वरचे दोन मजले प्रशासनाच्या नाकाखाली अनधिकृतपणे कसे उभे राहिले?

सुरक्षक भिंतीचा अभाव: ८५ एकरच्या डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्याचा डोंगर आणि बाजूचे बांधकाम यांच्यात 'अँटोनी लारा' कंपनीने संरक्षक भिंत उभारणे गरजेचे होते, परंतु तशी कोणतीही भिंत नव्हती.

Advertisement

चिमणी दुर्घटनेकडे दुर्लक्ष: ५ जून रोजी (पर्यावरण दिनी) या कचरा प्रकल्पाची चिमणी कोसळली होती. प्रकल्प बंद असल्याची माहिती असतानाही प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी यांनी कंपनीला जाब विचारला नाही ना कोणती कायदेशीर कारवाई केली.

शेजारील खाणींमधील स्फोट: कचऱ्याच्या डोंगराजवळ असलेल्या खाणींमध्ये सातत्याने ब्लास्ट (स्फोट) सुरू आहेत. यामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्याला तडे गेले असण्याची शक्यता असतानाही कुलकर्णी यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.

'कमिशनखोरी आणि अर्थकारणाची चौकशी व्हावी'

"कचरा व्यवस्थापनाचे कंत्राट घेतलेली अँटोनी लारा कंपनी, पालिका आयुक्त सूर्यवंशी आणि प्रकल्प अधिकारी संजय कुलकर्णी यांच्यात नेमके काय अर्थकारण आणि राजकारण शिजत आहे, याची सखोल चौकशी झाली पाहिजे," असे अंधारे म्हणाल्या.

दोन दिवसांपासून आयुक्त 'नॉट रिचेबल'

"दुर्घटनेत किती लोक अडकले, किती मृत पावले, याची अधिकृत माहिती देणे आयुक्तांचे कर्तव्य होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पालिका आयुक्त आणि त्यांचे स्वीय सहाय्यक फोन बंद करून बसले आहेत. दुसरीकडे, अधिकारी संजय कुलकर्णी आपली जबाबदारी आयुक्तांवर ढकलत आहेत. चेतन अग्रवाल प्रकरणात ६ तासांत कारवाई होते, मग इथे एफआयआर दाखल करायला विलंब का?" असा संतप्त सवाल अंधारे यांनी केला असून, याविरोधात कायदेशीर आणि राजकीय लढाई लढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.