अखेर तो क्षण आला... या ५०० जणांना मिळणार सरकारी नोकरी...

Share:
Main Image
Last updated: 13-Jul-2026

नागपूर, (प्रतिनिधी) १३ जुलै - सफाई कर्मचाऱ्यांसह समाजातील आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी राज्य सरकार आणि नागपूर महानगरपालिका पूर्णपणे कटिबद्ध आहे. नागपूर महानगराच्या वाढत्या गरजा आणि आव्हाने लक्षात घेऊन, 'लाड-पागे समिती'च्या शिफारसींनुसार लवकरच सुमारे ५०० वारसांना शासकीय नियुक्तीचे आदेश दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मौजा नारी येथे साकारण्यात येत असलेल्या 'महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत' आणि 'प्रधानमंत्री आवास योजना २.०' (शहरी) अंतर्गत 'स्वप्नपूर्ती' सदनिका प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते.

वसाहतीच्या कामात तडजोड नको: मुख्यमंत्री

या भव्य गृहनिर्माण प्रकल्पाचा पायाभरणी सोहळा केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, महर्षी सुदर्शन वाल्मिकी यांच्या नावाने ही हक्काची वसाहत उभी राहत असल्यामुळे, या कामाच्या दर्जाबाबत आणि सुविधांबाबत कोणतीही कमतरता राहू नये, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. गरिबांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना अत्यंत महत्त्वाची असून, आगामी काळात नागपूरच्या सर्व विधानसभा क्षेत्रांत या योजनेची अंमलबजावणी केली जाईल.

सुदर्शन वाल्मिकी समाजाचे जीवनमान उंचावणार: नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर मनपाच्या या उपक्रमाचे 'अत्यंत स्तुत्य प्रकल्प' म्हणून कौतुक केले. या दोन्ही गृहनिर्माण प्रकल्पांमुळे ८०० ते ९०० कुटुंबांना हक्काचे घर मिळणार आहे. यावेळी बोलताना त्यांनी समाजाला आधुनिक रोजगाराची कास धरण्याचे आवाहन केले. "सुदर्शन वाल्मिकी समाजाने आता केवळ पारंपरिक कामांवर अवलंबून न राहता हॉस्पिटॅलिटी (आतिथ्य) क्षेत्रात पदार्पण करावे, स्वतःच्या छोट्या कंपन्या सुरू करून सेवा पुरवाव्यात आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण कराव्यात," असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.

३ वर्षांत पूर्ण होणार 'स्वप्नपूर्ती'

Advertisement

नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणारे हे दोन्ही प्रकल्प पुढील ३ वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या संपूर्ण वसाहतीमध्ये अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, सुसज्ज उद्यान, खेळाचे मैदान, सोलर सिस्टीम आणि चोख सुरक्षा व्यवस्था अशा दर्जेदार नागरी सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

गृहनिर्माण प्रकल्पांची वैशिष्ट्ये:

महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत: सफाई कर्मचाऱ्यांसाठी मौजा नारी येथे एकूण १४ इमारती उभारल्या जातील, ज्यामध्ये ३९२ दर्जेदार '२-BHK' सदनिका (फ्लॅट्स) असतील.

स्वप्नपूर्ती गृहनिर्माण प्रकल्प: प्रधानमंत्री आवास योजना २.० अंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांसाठी (EWS) अत्यंत परवडणाऱ्या दरात ५१८ सदनिका (१ आणि २-BHK) उभारल्या जातील.

या सोहळ्याला राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वित्त राज्यमंत्री ॲड्. आशीष जयस्वाल, महापौर नीता ठाकरे, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंह डागोर, उपमहापौर लिला हातीबेड, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी, माजी महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्यासह लोकप्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.