पुणे, (प्रतिनिधी) १२ जुलै - पोलीस भरतीत जास्त गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका महिलेवर दोन पोलीस कर्मचाऱ्यांनीच अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. राज्य राखीव पोलीस दलातील (SRPF) पोलीस उपनिरीक्षक (PSI) अमरनाथ कुंभार आणि मुंबई पोलीस दलातील बँड पोलीस कॉन्स्टेबल मारुती करे अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने दोन्ही आरोपींवर पोलीस भरतीत मदत करण्याचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी तक्रार नोंदवण्यासाठी पीडितेने आधी पोलिसात धाव घेतली होती. मात्र, पोलिसांनी सुरुवातीला दाद न दिल्याने तिने अखेर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. पीडितेच्या याचिकेची दखल घेत न्यायालयाने दोन्ही आरोपींवर 'अॅट्रॉसिटी' (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) आणि लैंगिक शोषणाचे गंभीर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर बारामती ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अटक न झाल्याने पीडितेचा धरणे आंदोलनाचा इशारा
गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असतानाही आणि गुन्हा दाखल होऊनही दोन्ही आरोपी पोलिसांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेवर पीडित महिलेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. आरोपी पोलीस असल्यानेच प्रशासन त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना तात्काळ ताब्यात न घेतल्यास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन करण्याचा इशारा पीडितेने दिला आहे.
या खळबळजनक प्रकरणाचा पुढील तपास बारामती ग्रामीण पोलीस करत आहेत.