मुंबई, (प्रतिनिधी) १२ जुलै - भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळली गेलेली टी-20 सामन्यांची मालिका भारतीय संघासाठी अत्यंत निराशाजनक आणि नामुष्कीची ठरली आहे. या मालिकेतील एकही सामना भारतीय संघाला जिंकता आला नाही. पाचव्या आणि अंतिम टी-20 सामन्यात इंग्लंडने भारताचा ५६ धावांनी पराभव करत मालिका ४-० अशा फरकाने आपल्या नावावर केली. पावसामुळे मालिकेतील एक सामना रद्द करण्यात आला होता, मात्र खेळल्या गेलेल्या सर्वच सामन्यांत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
शेवटच्या सामन्यात बदलही ठरला निष्फळ; बटलर-ब्रूकचे वादळ
मालिकेतील सलग पराभवानंतर भारतीय संघाने शेवटच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल केला होता. फॉर्मात नसलेल्या वैभव सूर्यवंशीला संघातून बाहेर चा रस्ता दाखवत संजू सॅमसनला पुन्हा संधी देण्यात आली. मात्र, या बदलाचाही भारतीय संघाच्या कामगिरीवर कोणताही विशेष परिणाम झाला नाही.
अंतिम सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची अक्षरशः पिसें काढली. सलामीवीर जोस बटलर आणि कर्णधार हॅरी ब्रूक यांनी मैदानाभोवती चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. बटलरने अवघ्या ६४ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने १३१ धावांची स्फोटक शतकी खेळी केली. त्याला कर्णधार हॅरी ब्रूकने उत्तम साथ दिली. ब्रूकने ४५ चेंडूंत ८ षटकार आणि ४ चौकारांसह नाबाद ९५ धावा कुटल्या. या दोघांच्या झंझावातामुळे इंग्लंडने २० षटकांत ३ गडी गमावून २५७ धावांचा अवाढव्य डोंगर उभा केला.
भारतीय फलंदाजांची झुंज अपुरी
२५८ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. मात्र, मधल्या फळीत इशान किशनने ५६ धावांची आणि तिलक वर्माने ५३ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. पण इतर फलंदाजांकडून पुरेशी साथ न मिळाल्यामुळे भारतीय संघ २० षटकांत ८ गडी गमावून केवळ २०१ धावांपर्यंतच मजल मारू शकला. परिणामी, भारताला हा सामना ५६ धावांनी गमवावा लागला.
पराभवानंतर वैभव सूर्यवंशीला अनावर झाले अश्रू; व्हिडीओ व्हायरल
या मालिका पराभवानंतर संपूर्ण भारतीय गोटात शांतता पसरली असली, तरी संघातून वगळण्यात आलेला युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी या पराभवामुळे पुरता खचून गेला. शेवटच्या सामन्यात डगआऊटमध्ये उतरलेल्या चेहऱ्याने बसलेला वैभव भारताच्या पराभवानंतर स्वतःला सावरू शकला नाही आणि त्याला डगआऊटमध्येच रडू कोसळले.
सामन्यानंतर सर्व खेळाडू आपापल्या कामात व्यस्त असताना वैभव मात्र या पराभवाच्या धक्क्यातून बाहेर पडू शकला नव्हता. वैभव सूर्यवंशी हा अत्यंत हळवा खेळाडू असून यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थानचा संघ पराभूत झाला, तरीही त्याला अनेकदा रडू कोसळले होते. त्याचा हाच डगआऊटमधील भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, नेटकरी त्याच्या या क्रिकेटवरील प्रेमाचे कौतुक करत आहेत.