दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १० जुलै - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी येथे वाढती लोकसंख्या आणि प्रवाशांची गरज लक्षात घेऊन ग्राम आरोग्य केंद्राचा नव्या आराखड्यात समावेश करण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, अशी महत्त्वाची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधानपरिषद सदस्य सत्यजित तांबे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता, तर सदस्य रविंद्र फाटक, भाई जगताप आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावर उपप्रश्न विचारले होते.
शिर्डी मार्गावरील महत्त्वाचे केंद्र
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, वावी येथे पूर्वीपासून प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. मात्र, हे ठिकाण प्रसिद्ध शिर्डी साईबाबा मंदिराकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या महामार्गावर असल्याने येथे आरोग्य सुविधांचा विस्तार करणे अत्यंत गरजेचे आहे. बदलती लोकसंख्या आणि वाढत्या वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन आरोग्य विभागाचा नवीन आराखडा तयार केला जात असून, त्यात वावी ग्राम आरोग्य केंद्राच्या प्रस्तावाचा प्राधान्याने आणि सकारात्मक विचार केला जाईल.
आरोग्य संस्था तातडीने कार्यान्वित करणार
नवीन रुग्णालयांना मंजुरी मिळाल्यानंतर निधी, पदनिर्मिती, आवश्यक वैद्यकीय उपकरणे आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांमुळे काहीसा वेळ लागतो, अशी कबुली मंत्र्यांनी दिली. मात्र, गेल्या काही वर्षांत या प्रक्रियेला गती देण्यात आली असून, राज्यातील बांधून तयार असलेल्या सर्व आरोग्य संस्था आणि रुग्णालये लवकरात लवकर जनतेच्या सेवेत कार्यान्वित करण्यासाठी शासन पूर्ण ताकदीने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कुंभमेळ्यासाठी आरोग्य विभाग सज्ज!
नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली जाईल. लाखो भाविकांची सुरक्षा आणि आरोग्य लक्षात घेऊन सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही आरोग्य मंत्र्यांनी यावेळी दिली.