तिसऱ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा तोडून ठोकल्या बेड्या... किशोर महाराजला नाट्यमय अटक... काय आहे प्रकरण?

Share:
Main Image
Last updated: 12-Jul-2026

लातूर, (प्रतिनिधी) १२ जुलै - जिल्ह्यातील खंडापूर येथील बहुचर्चित ३ कोटी ६५ लाख रुपयांच्या देणगी अपहार प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी किशोर धोंडीराम जाधव ऊर्फ 'किशोर महाराज' शिवणीकर याला लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अत्यंत नाट्यमयरीत्या बेड्या ठोकल्या. अटक टाळण्यासाठी आरोपीने स्वतःला घरात कोंडून घेतले होते, मात्र पोलिसांनी दरवाजा तोडून त्याला ताब्यात घेतले.

अखंड हरिनाम सप्ताहातील देणगीवर डल्ला

लातूर तालुक्यातील खंडापूर येथे काही दिवसांपूर्वी भव्य अखंड हरिनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक उत्सवासाठी भाविक, संस्था आणि देणगीदारांकडून मोठ्या प्रमाणावर निधी गोळा करण्यात आला होता. मात्र, या उत्सवातील तब्बल ३ कोटी ६५ लाख रुपयांच्या देणगीचा अपहार झाल्याचे समोर आल्यानंतर वारकरी संप्रदायासह संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. या आर्थिक फसवणूक प्रकरणात 'किशोर महाराज' शिवणीकर याच्यावर मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दोन तास थरार; खोलीचा दरवाजा तोडला!

Advertisement

गुन्हा दाखल झाल्यापासून अटक टाळण्यासाठी आरोपी पोलिसांना गुंगारा देत लपून बसला होता. अखेर तो लातूर शहरातील मोतीनगर परिसरातील आपल्या राहत्या घरीच असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.

पोलिसांची चाहूल लागताच शिवणीकर याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका खोलीत स्वतःला कोंडून घेतले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी नातेवाईकांनी त्या खोलीला बाहेरून कुलूप लावले होते, जेणेकरून घरात कोणीच नाही असा भास निर्माण होईल. मात्र, पोलिसांनी मोतीनगरमधील त्या इमारतीभोवती वेढा घातला. घरात प्रवेश करून तिसऱ्या मजल्यावरील बंद खोलीचा दरवाजा उघडण्यास सांगितले असता आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर खोलीचा मुख्य दरवाजा तोडला आणि आत लपलेल्या महाराजला बाहेर काढले.

आर्थिक गैरव्यवहारात आणखी कोणाचा हात?

गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकल्याने या प्रकरणातील अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. या ३ कोटी ६५ लाखांच्या भव्य अपहारामध्ये महाराजला आणखी कोणी मदत केली होती का आणि हा पैसा कुठे वळवण्यात आला, याचा सखोल तपास आता लातूर पोलीस करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.