महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनात रचला गेला हा इतिहास... एकूण किती कामकाज झाले?

Share:
Main Image
Last updated: 11-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ११ जुलै - महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. कामकाजाचे नवे उच्चांक प्रस्थापित करणारे हे अधिवेशन ठरले असून, पुढील हिवाळी अधिवेशन सोमवार, ७ डिसेंबर २०२६ रोजी नागपूर येथील विधानभवनात होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली. या पावसाळी अधिवेशनात एकूण १४ बैठका घेण्यात आल्या असून, १२७ तास ५४ मिनिटांचे प्रत्यक्ष कामकाज झाले. रोजच्या कामकाजाची सरासरी ९ तास ९ मिनिटे इतकी राहिलेली असून सदस्यांची सरासरी उपस्थिती ७५.२६ टक्के (सर्वोच्च उपस्थिती ८४.९६ टक्के) नोंदवली गेली.

अनेक वर्षांनंतर नवा इतिहास!

या अधिवेशनातील सर्वात विशेष आणि ऐतिहासिक बाब म्हणजे ९ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता सुरू झालेली सभागृहाची बैठक थेट दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० जुलै रोजी पहाटे ३:३९ वाजेपर्यंत अविरत चालली. अनेक वर्षांनंतर एकाच दिवसात तब्बल १८ तास १० मिनिटे इतके प्रदीर्घ कामकाज चालले असून, विविध लोकहितार्थ विषयांवर सखोल चर्चा झाली.

अधिवेशनातील कामकाजाचा संपूर्ण ताळेबंद:

१. प्रश्नोत्तरे आणि लक्षवेधी सूचना

प्रश्नोत्तर: अधिवेशनादरम्यान एकूण ९,०९५ प्रश्न प्राप्त झाले. त्यापैकी ४१० प्रश्न स्वीकृत करण्यात आले, तर ५८ प्रश्नांना सभागृहात तोंडी आणि ५०० प्रश्नांची लेखी उत्तरे देण्यात आली.

लक्षवेधी: २,९९८ सूचनांपैकी २९२ स्वीकृत करण्यात आल्या, तर ६२ सूचनांवर सभागृहात थेट चर्चा झाली.

चर्चा: अल्पकालीन चर्चेसाठी प्राप्त ६ सूचनांपैकी ५ मान्य करून ३ चर्चा पार पडल्या. नियम २९३ अन्वये प्राप्त पाचही प्रस्तावांवर सविस्तर चर्चा झाली.

२. विधेयके आणि कायदेविषयक कामकाज

Advertisement

अधिवेशनादरम्यान एकूण ७ अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले.

शासकीय २२ विधेयके पुरःस्थापित करण्यात आली, त्यापैकी २१ विधेयके विधानसभेने संमत केली तर १ विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्यात आले.

विधान परिषदेने एकूण ९ विधेयके संमत केली

अशासकीय २९ विधेयकांच्या सूचनांपैकी ११ मान्य करण्यात आल्या. त्यापैकी १२ विधेयके पुरःस्थापित आणि ८ विचारात घेण्यात आली.

३. सार्वजनिक महत्त्वाच्या बाबी

सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवरील ३२४ सूचनांपैकी १३६ सूचना मान्य करण्यात आल्या आणि त्यावर १० चर्चा पार पडल्या. याशिवाय, अर्धा तास चर्चेच्या १४ सूचनांवर चर्चा झाली आणि अंतिम आठवडा प्रस्तावावरही दोन्ही बाजूच्या सदस्यांनी सविस्तर चर्चा केली.

विधानपरिषदेत १०१ तास १० मिनिटे कामकाज

विधानपरिषदेत १०१ तास १० मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ७ तास १३ मिनिटे झाले. या अधिवेशनात सभागृहात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ९०.१४ टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही ७८.५७ टक्के इतकी होती.

विधानपरिषदेत ९ विधेयके पूर:स्थापित करण्यात आली आणि ती संमत करण्यात आली. विधानसभेने पारित केलेली १८ विधेयके विधानपरिषदेत संमत करण्यात आली. तर ३ विधेयके शिफारशींशिवाय विधानसभेकडे परत पाठविण्यात आली. सभागृहात नियम ९७ अन्वये एकूण ४९ प्राप्त सूचना, तर ४८ सूचना मान्य करण्यात येऊन त्यावर चर्चा झाली. अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल सभापती राम शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

Advertisement

Comments

No comments yet.