मुंबई, (प्रतिनिधी) १० जुलै - जागतिक फॅशनची राजधानी समजल्या जाणाऱ्या पॅरिसमध्ये भारतीय फॅशन आणि कारागिरीचा डंका वाजला आहे. रिलायन्स रिटेलच्या कार्यकारी संचालक ईशा अंबानी यांनी पॅरिस हाउट कुट्यूर वीकमध्ये (Paris Haute Couture Week) आपल्या खास लूकने जागतिक फॅशन जगताचे लक्ष वेधून घेतले. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या ऐतिहासिक 'ऑटम/विंटर २०२६ हाउट कुट्यूर शो'मध्ये त्यांनी विशेष उपस्थिती लावली.
७०० तासांच्या मेहनतीतून साकारली 'आई' संकल्पना
या ऐतिहासिक सोहळ्यासाठी ईशा अंबानी यांनी परिधान केलेला सुवर्णवर्णीय (Golden) गाऊन फॅशन जगतात चर्चेचा विषय ठरला आहे. हा गाऊन मनीष मल्होत्रा यांनी आंतरराष्ट्रीय स्टायलिस्ट अँड्र्यू मुकामल यांच्या सहकार्याने विशेषतः ईशा अंबानी यांच्यासाठी डिझाइन केला होता. मुंबईत ७०० हून अधिक तासांच्या अत्यंत सूक्ष्म हस्तकलेतून (Handloom) हा गाऊन साकारण्यात आला आहे.
या गाऊनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची रचना ‘MAA (आई)’ या संकल्पनेवर आधारित आहे. प्रेम, सामर्थ्य आणि सन्मानाच्या बळावर पिढ्या घडविणाऱ्या महिलांना हा गाऊन समर्पित करण्यात आला आहे. यामध्ये भारतीय जरी-झरदोजी हस्तकला, सली आणि तबान या पारंपरिक भरतकाम शैलींसह अत्यंत आकर्षक असे क्रिस्टल्स हाताने जडवण्यात आले आहेत.
६२ कॅरेटच्या हिऱ्यांच्या दागिन्यांची जोड
ईशा अंबानी यांनी या सुवर्णवर्णीय गाऊनला साजेसे दागिने परिधान केले होते. त्यांनी फॅशन विश्वात अत्यंत दुर्मिळ मानले जाणारे प्रसिद्ध डिझायनर लॉरेन श्वार्ट्झ यांचे ५० कॅरेटचे न्यूड डायमंड इअररिंग्स (कानातील झुमके) आणि १२ कॅरेटची पिअर-शेप न्यूड डायमंड रिंग (अंगठी) परिधान केली होती. सुवर्णवर्णीय गाऊन आणि हिऱ्यांच्या या देखण्या संगमातून भारतीय कारागिरी आणि पाश्चात्य आधुनिक डिझाइनचा उत्कृष्ट मिलाफ आंतरराष्ट्रीय मंचावर पाहायला मिळाला.
भारतीय कारागिरीला जागतिक व्यासपीठ
मनीष मल्होत्रा यांच्या पॅरिसमधील या पहिल्याच सादरीकरणाला अधिकृत कुट्यूर कॅलेंडरमध्ये स्थान मिळाल्याने या शोला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले होते. ईशा अंबानी यांनी या फॅशन वीकमध्ये मनीष मल्होत्रा यांच्यासह भारताचे प्रसिद्ध डिझायनर राहुल मिश्रा यांच्याही सादरीकरणाला हजेरी लावली. रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून भारतीय डिझायनर्स, लक्झरी ब्रँड्स आणि स्थानिक कारागिरांना जागतिक स्तरावर हक्काचे व्यासपीठ आणि ओळख मिळवून देण्याच्या ईशा अंबानी यांच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा एक महत्त्वपूर्ण भाग मानला जात आहे.