मुंबई, (प्रतिनिधी) १० जुलै - "राज्यातील शहरांचा सध्या पार विचका करून ठेवला असून, केवळ रस्ते आणि उड्डाणपूल बांधणे म्हणजे विकास नव्हे. १ मे रोजी उद्घाटन झालेल्या महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' प्रकल्पावर अवघ्या दोन महिन्यांत दरड कोसळते आणि पाणी गळते, तरीही मुख्यमंत्री 'राजकारण करू नका' म्हणून कांगावा करत आहेत. वास्तविक, आज सिस्टीममध्ये कंत्राटदारांना ५६ टक्के कट प्रॅक्टिस द्यावी लागत असल्याच्या चर्चा आहेत. जर उरलेल्या ४४ टक्क्यांत काम करायचे असेल, तर अशाच निकृष्ट दर्जाची कामे समोर येणार," अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली. महाराष्ट्र नवनिर्माण रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ देताना विन्स्टन चर्चिल यांच्या मुद्द्यावर बोलताना 'व्ही फॉर व्हिक्टरी' आणि 'व्ही फॉर विन्स्टन' ऐवजी 'व्ही फॉर इनव्हिन्सीबल' (Invincible - अजिंक्य) असे म्हणायचे होते, अशी मिश्किल कबुली देत आपली चूक सुधारली.
भाषणातील प्रमुख आणि वादळी मुद्दे:
२००८ चे रेल्वे आंदोलन विसरू नका
"पक्षाची वाढ आणि 'रेल्वे इंजिन' हे चिन्ह २००८ च्या ऐतिहासिक रेल्वे भरती आंदोलनातून मिळाले आहे. महाराष्ट्रातील रेल्वे भरतीची जाहिरात उत्तर भारतातील राज्यांत प्रसिद्ध केली गेल्याने स्थानिक मराठी तरुणांवर अन्याय होत होता. त्या आंदोलनामुळे माझ्यासकट अनेक महाराष्ट्र सैनिकांना तुरुंगात जावे लागले, पण त्याच संघर्षामुळे आज हजारो मराठी तरुण रेल्वेत नोकरी करत आहेत. रेल्वे कामगार सेनेने यापुढेही मराठी तरुणांच्या हक्कांवर लक्ष ठेवावे."
मुख्यमंत्र्यांची 'बघून घेण्याची' भाषा आणि विधिमंडळात हिंदी!
"मिसिंग लिंकच्या दुरवस्थेवर टीका झाल्यावर मुख्यमंत्री म्हणतात, 'मला बोला, महाराष्ट्राला बोलू नका'. यात महाराष्ट्राचा अपमान कुठे आला? केंद्राच्या चुकीवर बोलले की देशविरोधी आणि राज्याच्या चुकीवर बोलले की महाराष्ट्रविरोधी ठरवण्याची नवी पद्धत सुरू आहे. मुख्यमंत्री विधिमंडळात 'बघून घेईन' अशी धमकी वजा भाषा थेट हिंदीत बोलतात. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विधिमंडळात कोणाला दाखवण्यासाठी हिंदीत बोलतोय? बहुदा दिल्लीतील 'वरच्यांना' ते दाखवून देत असावेत."
राम मंदिरातील १४०० कोटींच्या अपहारावर गप्प का?
"राम मंदिराच्या दानपेटीतून १४०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले, त्यावर आम्ही बोललो तर आम्हाला 'धर्माचे शत्रू' ठरवले जाते आणि 'वक्फ बोर्डावर का बोलत नाही' असा प्रतिप्रश्न केला जातो. वक्फ बोर्डात काय सुरू आहे याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. हिंदू भाविकांनी श्रद्धेने दिलेला पैसा गायब झाला, यावर 'आरएसएस' (RSS) चे दत्तात्रय होसबळे म्हणतात की गैरहिंदू याचा फायदा घेतील. या ट्रस्टवर भाजप आणि संघाशी संबंधित लोक आहेत. कल्पना करा, हा अपहार भाजप सत्तेत नसताना झाला असता, तर यांनी मोर्चे आणि आंदोलने काढून देश डोक्यावर घेतला नसता का?"
२००५ आणि २०२६ ची मुंबई: टोलवाटोलवी सुरू
"२००५ च्या ढगफुटीत मुंबईत जवळपास १००० मिलिमीटर पाऊस झाला होता, तेंव्हा मुंबई बुडाली होती. आज अवघा ३०० मिलिमीटर पाऊस झाल्यावरही मुंबईची तीच दैना झाली. तेंव्हा टीका करणारे भाजपचे मंत्री आज याला 'नैसर्गिक आपत्ती' म्हणून टीका न करण्याचे आवाहन करत आहेत. स्वतःवर आले की यांना लगेच नैसर्गिक आपत्ती आठवते."
जनतेची भावनाशून्यता आणि लोकशाहीचे 'चर्चिल' उदाहरण
"इतके सगळे होऊनही आजची जनता राग व्यक्त करत नाही. लोक आपला राग फक्त मोबाईल आणि सोशल मीडियावर व्यक्त करून शांत बसतात. विधिमंडळात लोक गटारात पडून मरत असल्यावर चर्चा सुरू असताना भाजपचा आमदार हसतो, कारण हे लोक भावनाशून्य झाले आहेत. दुसऱ्या महायुद्धात विन्स्टन चर्चिल यांनी इंग्लंडला विजय मिळवून दिला, तरीही तिथल्या सुज्ञ जनतेने पुढच्या ८ महिन्यांत शांततेच्या काळासाठी त्यांना नाकारून विरोधी पक्षाला निवडून दिले. समाज फक्त सुशिक्षित असून चालत नाही, तर तो सुज्ञ असावा लागतो."
'तोडफोडी'चे राजकारण आणि कार्यकर्त्यांना सतर्कतेचा इशारा
"आजचे सत्ताधारी केवळ आमदार, खासदार आणि नगरसेवक कसे फोडता येतील यातच रमले आहेत. ब्रिटिशांनी बांधलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि पूल आजही भक्कम उभे आहेत, अमेरिकेची एम्पायर स्टेट बिल्डिंग १४ महिन्यांत उभी राहून आजही टिकून आहे; मग आपल्याकडेच कामांचा दर्जा का घसरतो? नितीन गडकरींचे काम रस्ते बांधायचे आहे, ते सोडून ते पेट्रोलमध्ये इथेनॉल किती मिसळायचे यावर बोलत आहेत, ते काम पेट्रोलियम मंत्र्यांचे आहे. मनसे कार्यकर्त्यांनी आता पूर्णपणे सतर्क राहून मराठी मुलांना नोकऱ्या, टेंडर आणि कामे मिळतात की नाही, यावर कडक पहारा ठेवावा," असे आवाहन राज ठाकरे यांनी शेवटी केले.