मुंबई, (प्रतिनिधी) ९ जुलै - विधिमंडळ अधिवेशनात नांदगावचे शिवसेना (शिंदे गट) आमदार सुहास कांदे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या टेंडर प्रक्रियेबाबत केलेल्या आरोपांनंतर नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या आरोपांना माजी खासदार समीर भुजबळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, हे सर्व आरोप धादांत खोटे, राजकीय सूडबुद्धीने आणि वैफल्यग्रस्ततेतून केले असल्याचा पलटवार त्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाशी आपला दुरान्वयेही संबंध नसल्याचा खुलासा भुजबळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
मंत्रिमंडळाच्या मान्यतेनेच निविदा प्रक्रिया
आमदार सुहास कांदे यांच्या आरोपांमधील हवा काढून घेताना समीर भुजबळ यांनी स्पष्ट केले की, "अन्न व नागरी पुरवठा विभागाची सदर निविदा प्रक्रिया ही कायदेशीर मार्गाने आणि थेट मंत्रिमंडळाच्या मान्यतेनेच राबविली गेली आहे. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नाही."
प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ
"सदर निविदा प्रक्रियेच्या विरोधात काही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित असल्याने न्यायालय यावर योग्य तो निर्णय देईल आणि अन्न नागरी पुरवठा विभाग त्यानुसार पुढील अंमलबजावणी करेल," असे सांगत भुजबळ यांनी या विषयावर विनाकारण राजकारण केले जात असल्याचे म्हटले आहे.
अभ्यासाअभावी आणि वैफल्यग्रस्ततेतून आरोप
आमदार सुहास कांदे यांचे नाव न घेता समीर भुजबळ यांनी त्यांच्यावर कडक शब्दांत टीका केली. "विषयाचा कोणताही अभ्यास न करता केवळ राजकीय सूडबुद्धीने आणि वैफल्यग्रस्ततेपोटी काही लोकांनी विधिमंडळात हे धादांत खोटे आरोप केले आहेत. अशा बिनबुडाच्या आणि अभ्यासाशिवाय केलेल्या आरोपांकडे लक्ष देण्याची अजिबात आवश्यकता नाही," असे भुजबळ यांनी आपल्या खुलाशात स्पष्ट केले आहे.