पिंपरी-चिंचवड, (प्रतिनिधी) ९ जुलै - पिंपरी-चिंचवड परिसरातील मोशी येथे मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा मोठा ढीग कोसळून इमारतीमध्ये नागरिक अडकल्याची धक्कादायक दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेतील नागरिकांच्या सुटकेसाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत ६ जणांना ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून, उर्वरित नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे हीच शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
दुर्घटना घडताच मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सुरू असलेल्या बचावकार्याची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, महापौर रवी लांडगे, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
२३ नागरिक अडकले; ६ सुखरूप, तर ३ जणांशी संपर्क
मंत्री गिरीश महाजन यांनी दुर्घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, "दुर्घटना घडली तेव्हा इमारतीत एकूण २३ नागरिक अडकले होते. त्यापैकी इमारतीच्या वरच्या मजल्यावर असलेले ५ नागरिक स्वतःहून सुरक्षित बाहेर पडले. त्यानंतर बचाव पथकाने तत्परता दाखवत ६ नागरिकांना सुखरूप बाहेर काढले. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आणखी ३ नागरिकांशी संपर्क झाला असून ते सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. उर्वरित नागरिकांचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत."
३० तासांत ६०० मि.मी. पाऊस कारणीभूत
गेल्या ३० ते ३५ तासांत मोशी आणि परिसरात तब्बल ६०० मि.मी. पेक्षा अधिक मुसळधार पाऊस झाला. यामुळे स्थानिक कचरा डेपोमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आणि पाण्याचा दाब वाढल्याने कचऱ्याचा प्रचंड लोट इमारतीच्या दिशेने वाहून आला. या नैसर्गिक आपत्तीमुळे ही दुर्दैवी घटना घडल्याचे मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.
जागा अरुंद असल्याने बचावकार्यात अडथळे; मोहीम रात्रभर चालणार!
"सध्या घटनास्थळी इमारतीचा मलबा आणि कचरा हटविण्याचे काम सुरू आहे. मात्र, दुर्घटनाग्रस्त भागातील जागा अत्यंत कमी व अरुंद असल्यामुळे अवजड यंत्रसामग्री वापरताना मर्यादा येत आहेत. कोणतीही अतिरिक्त जीवितहानी होऊ नये, यासाठी अत्यंत काळजीपूर्वक आणि काही प्रमाणात संथगतीने काम करावे लागत आहे. हे बचावकार्य रात्रभर आणि गरज पडल्यास उद्या सकाळपर्यंत अविरत सुरू राहील."
— गिरीश महाजन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री
सुरक्षित बाहेर आलेले नागरिक:
बचाव पथकाने बाहेर काढलेले (६ जण): सोमनाथ शेळके, सचिन दवडगाव, दादासाहेब आरडे, सुजाता शिंदे, रामप्रताप चव्हाण आणि रणवीर सिंह.
स्वतःहून सुरक्षित बाहेर पडलेले (५ जण): अशोक गुप्ता, मुनेंद्र कुमार, चंद्रशेखर सिंह, दिनेश सुतार आणि श्री बाला.
या दुर्घटनेतील प्रत्येक नागरिकाचा जीव वाचवण्यासाठी पिंपरी-चिंचवड मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परस्पर समन्वयाने काम करत असून संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.