मुंबई, (प्रतिनिधी) ८ जुलै - राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) विभागातील कथित गैरव्यवहार, कर चुकवेगिरी आणि इतर अनियमिततांच्या प्रकरणांची 'विशेष तपास पथका'मार्फत (SIT) उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. या चौकशीसाठी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून, त्यांना एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सभागृहात सदस्य विजय वडेट्टीवार यांनी आरटीओमधील गैरव्यवहारांबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. या विषयाची गंभीर दखल घेण्यात आली असून परिवहन मंत्र्यांशी चर्चा करूनच हा चौकशीचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
महागड्या गाड्यांची परराज्यात नोंदणी करून कर चुकवेगिरी
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या विषयावरील चर्चेला उत्तर देताना आरटीओमधील कर चुकवेगिरीचे धक्कादायक प्रकार सभागृहासमोर आणले. "काही वाहनमालक महाराष्ट्रात राहतात, राज्यातील बँकांकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतात; मात्र महागड्या लक्झरी वाहनांची नोंदणी महाराष्ट्रात न करता दादरा-नगर हवेली, दमण-दीव, पुदुच्चेरी यांसारख्या केंद्रशासित प्रदेशांत करतात. यामुळे राज्याचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे," असे सरनाईक यांनी सांगितले. या कर चुकवेगिरीला चाप लावण्यासाठी भविष्यात जीएसटी पडताळणी तसेच कर्ज व रहिवासाशी संबंधित कागदपत्रांची काटेकोर तपासणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात चौकशी
आरटीओ विभागासंदर्भात प्राप्त झालेल्या विविध तक्रारी, कथित गैरव्यवहारांच्या ध्वनिचित्रफिती (व्हिडिओ) आणि अन्य आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रियंका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली 'एसआयटी' स्थापन करण्यात आली आहे.
समितीची रचना अशी असेल:
अध्यक्ष: प्रियंका ननावरे (वरिष्ठ आयपीएस अधिकारी)
सदस्य: रवी गायकवाड (अतिरिक्त परिवहन आयुक्त)
सदस्य: मंदार जावळे (दक्षता अधिकारी)
"या त्रिसदस्यीय समितीला आरटीओ विभागातील सर्व तक्रारींचा सखोल अभ्यास करून एका महिन्याच्या आत आपला चौकशी अहवाल सरकारला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अहवालानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल."
— प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
या उच्चस्तरीय चौकशीच्या घोषणेमुळे आरटीओ वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, अनेक बड्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.