चाळीसगाव, (प्रतिनिधी) ८ जुलै - रस्त्यांच्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी आणि मूल्यांकन नोंदी घेण्यासाठी तब्बल १० हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ७ हजार रुपये स्वीकारताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्याला (वर्ग १) आणि त्याच्या सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी (दि. ७ जुलै) रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे चाळीसगाव आणि धुळे जिल्हा परिषद वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. यथार्थ पांडुरंग निनावे (वय ४५, उपविभागीय अभियंता) आणि कुलदिप विरुचंद गमे (वय ३०, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, वर्ग ३) अशी अटक करण्यात आलेल्या लाचखोर लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्याची नावे आहेत. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके काय आहे प्रकरण?
तक्रारदार यांच्या मित्राने मौजे दहिवद येथे ग्रामपंचायत १५ व्या वित्त आयोगांतर्गत रस्ता काँक्रिटीकरण आणि गावहाळचे काम घेतले होते. हे काम त्यांनी तक्रारदार यांना करण्यासाठी दिले होते. तक्रारदार यांनी हे काम मुदतीत पूर्ण केले. या कामाचे एकूण १० लाख ४७ हजार ८४३ रुपयांचे बिल अदा करण्यासाठी, तसेच मोजमाप पुस्तिकेत (Measurement Book) नोंदी व मूल्यांकन करण्यासाठी ही फाईल उपविभागीय अभियंता यथार्थ निनावे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती.
१ टक्के कमिशनची मागणी
३ जुलै २०२६ रोजी तक्रारदार यांनी चाळीसगाव येथील कार्यालयात जाऊन अभियंता निनावे यांची भेट घेतली. त्यावेळी निनावे याने एकूण बिलाच्या १ टक्का म्हणजेच १०,५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी ७ जुलै रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली.
एसीबीचा सापळा आणि अटक
तक्रार मिळताच एसीबीच्या पथकाने मंगळवारी चाळीसगाव कार्यालयात पंचांसमक्ष पडताळणी केली. तडजोडीअंती १० हजार रुपयांवरून ७ हजार रुपये लाच घेण्याचे निनावे याने मान्य केले. त्यानंतर एसीबीने तातडीने कार्यालयात सापळा रचला.
उपविभागीय अभियंता यथार्थ निनावे याच्या सांगण्यावरून त्याचा सहायक कुलदिप गमे याने तक्रारदार यांच्याकडून ७ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारली. रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने दोघांना पंचांसमक्ष रंगेहात पकडले.
कारवाई करणारे पथक
ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता फडतरे आणि अपर पोलीस अधीक्षक प्रदिप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, तसेच अंमलदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील आणि जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.
नागरिकांना आवाहन:
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कामासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांच्याशी संपर्क साधावा. नागरिक टोल फ्री क्रमांक १०६४ किंवा व्हॉट्सॲप क्रमांक ७७९८१६१०६४ वर तक्रार नोंदवू शकतात, असे आवाहन एसीबीतर्फे करण्यात आले आहे.