मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यात कशी आहे स्थिती? कोणते रस्ते बंद? नदीकाठच्या गावांसाठी असा आहे इशारा...

Share:
Main Image
Last updated: 07-Jul-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) ७ जुलै - भारतीय हवामान विभागाने (IMD) नाशिक जिल्ह्याला पावसाचा 'हाय अलर्ट' दिला असून, काल रात्रीपासूनच जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. घाटमाथ्यासह नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. सुदैवाने कुठेही ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झालेली नाही आणि मोठ्या नुकसानीचे वृत्त नाही. मात्र, एकूण परिस्थिती नियंत्रणात असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व क्षेत्रीय अधिकारी प्रत्यक्ष फिल्डवर तैनात आहेत. जिल्ह्यात सध्या पूर आणि दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अतिधोकादायक भागातील परिस्थिती हाताळण्यासाठी इगतपुरी येथे 'एसडीआरएफ' (SDRF) चे एक पथक तैनात करण्यात आले आहे.

नांदूर मधमेश्वरमधून विसर्ग; गोदाकाठच्या गावांना इशारा
पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाणी पातळी वाढली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. धरणाच्या दोन वक्रकार गेटमधून सध्या ३ हजार २२८ क्युसेक वेगाने पाणी सोडले जात असून यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. निफाडचे प्रांत अधिकारी शशिकांत मंगरूळ यांनी रात्रीच सायखेडा, चांदोरी, करंजगाव, शिंगवे या गावांना भेटी देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

दिलासादायक: 'व्हॉर्टेक्स' सुरत आणि अकोल्याकडे सरकले
काल पालघरमध्ये तब्बल ४५० मिमी पाऊस पाडणारा आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक मार्गे जाण्याची शक्यता असलेला 'भोवरा' (Vortex) आता उत्तर दिशेला सुरतच्या दिशेने आणि दक्षिण दिशेला अकोले (अहिल्यानगर) परिसराकडे सरकला आहे. पश्चिमेकडील पट्टा पेठ, सुरगाणामार्गे बागलाणकडे सरकण्याची शक्यता असली, तरी नाशिकवरील थेट मोठे संकट सध्या टळले असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

Advertisement

रस्ते व वाहतुकीवर परिणाम; अनेक मार्ग बंद
भावडबारी घाट बंद: देवळा तालुक्यातील दरड कोसळण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून भावडबारी घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
नांदुरी–सप्तशृंगीगड घाट ३ दिवस बंद: सप्तशृंगीगड घाट रस्ता पुढील तीन दिवस बंद ठेवण्यात आला असून, परिसरातील धबधबे आणि ट्रेकिंग पॉईंट्सवरही पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
कसारा घाटात दगड कोसळले: मुसळधार पावसामुळे कसारा घाटात रस्त्यावर दगड आले असून वाहनचालकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तात्पुरते पूल वाहून गेले/बंद: पहिने-भिलमाळ रस्त्यावरील तात्पुरता पूल वाहून गेल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. तसेच दिंडोरी येथील धामण नदीवरील पुलाचे काम सुरू असल्याने तयार केलेला तात्पुरता रस्ता नदीची पातळी वाढल्याने बंद करण्यात आला आहे. कौटंबी घाटात दगडी बांध कोसळले असून तेथे जेसीबीच्या सहाय्याने काम सुरू आहे. प्रयागतीर्थकडून तळवाडेकडे जाणारा कच्चा रस्ताही पाण्याखाली गेल्याने बंद आहे.

कोरोना काळानंतर पहिल्यांदाच त्र्यंबकेश्वर मंदिर बंद!
संभाव्य मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आज मंगळवारी प्रसिद्ध श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाच्या सूचनेनुसार बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच अशा आपत्कालीन परिस्थितीमुळे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. मुख्य प्रवेशद्वारापाशी बॅरिकेड्स लावण्यात आले असून, बाहेरून आलेल्या भाविकांनी दुरूनच दर्शन घेत माघार घेतली. प्रशासनाने भाविकांना घरीच थांबून नामस्मरण करण्याचे आवाहन केले आहे.

 जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश:
आरोग्य आणि पशुसंवर्धन विभाग 'अतिसतर्क': वैद्यकीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय सोडू नये. रुग्णालयांमध्ये 'अँटी स्नेक व्हेनम' (सर्पदंश प्रतिबंधक लस) व आवश्यक औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावा. आशा स्वयंसेविकांनी घरोघरी जाऊन रुग्णांची माहिती घ्यावी.
दरड प्रवण क्षेत्रांचे सूक्ष्म नियोजन: सततच्या पावसामुळे खडकावरील मातीचा स्तर कमकुवत होतो. अशा भागात पाण्याचा आवाज आल्यास तातडीने नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करावे. पोलीस, वनविभाग, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेने समन्वयाने पूर प्रतिबंधक नियोजन करावे.

Advertisement

Comments

No comments yet.