एस.के. खेडकर, (नाशिक) ६ जुलै - भारतीय हवामान विभागाने (IMD) नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि नाशिक तालुक्याच्या पश्चिम भागात मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त ढगफुटीसदृश अतिवृष्टीची दाट शक्यता वर्तवली आहे. जीएफएस (GFS) अंदाजानुसार, आज सायंकाळी ६ वाआजपासून उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत जिल्ह्यात जवळपास २०० मिमी पाऊस पडू शकतो, ज्यामध्ये आज मध्यरात्री १.०० वाजेपासून ते उद्या सकाळी १०.०० वाजेपर्यंतचा काळ अत्यंत गंभीर (Critical Hours) असेल.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर आले असून आपत्ती निवारणाचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून त्र्यंबकेश्वर मंदिर आणि वणी येथील सप्तशृंगी देवीचे मंदिर बुधवार (९ जुलै) सकाळपर्यंत दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक ग्रामीण, पेठ, दिंडोरी आणि सुरगाणा या सहा तालुक्यांमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि आठवडे बाजार मंगळवारी बंद राहतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
प्रशासनाचे महत्त्वाचे निर्णय आणि उपाययोजना:
धबधबे आणि पर्यटनस्थळांवर नाकाबंदी: जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणे, गडकिल्ले आणि धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास पूर्ण बंदी घालण्यात आली असून तेथे पोलीस, गृहरक्षक दल आणि आपत्ती मित्रांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
'SDRF'ची तुकडी पाचारण: आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी धुळे येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (SDRF) एक तुकडी नाशिकमध्ये मागवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना आवाहन: मुसळधार पावसाची शक्यता पाहता शेतकरी बांधवांनी शेतात जाणे टाळावे आणि नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.
रेल्वे प्रशासन सतर्क: मुंबई-दिल्ली हा मुख्य रेल्वे मार्ग इगतपुरी तालुक्यातून जात असल्याने रेल्वे विभागाला विशेष सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गर्भवतींची काळजी: अतिवृष्टीच्या काळात संपर्क तुटू नये म्हणून या भागातील प्रसूतीचा कालावधी पूर्ण झालेल्या महिलांना आजच सुरक्षितपणे रुग्णालयात दाखल करून घेतले जात आहे.
आरोग्य आणि जलसंपदा यंत्रणा तत्पर
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी सांगितले की, आरोग्य विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अत्यावश्यक औषधांचा साठा उपलब्ध केला आहे. तसेच, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी पूर नियंत्रण कक्ष सुरू केला असून लहान-मोठ्या बंधाऱ्यांवर व धरणांवर चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे.
घाबरू नका, दक्षता बाळगा!
"प्रशासनाने सर्व प्रकारची पूर्वतयारी केली आहे. नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये. वाहत्या पाण्यातून प्रवास करणे टाळावे आणि दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागात जाण्याचा धोका पत्करू नये."
— आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक.